सातारा : हॉस्पिटलचे नोंदणी नूतनीकरण प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक सोमनाथ रामचंद्र पोतदार (वय ४३, रा. रोकडे सर गल्ली, रहिमतपूर, ता. कोरेगाव) दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. याविषयी अधिक माहिती अशी की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि. ५ मे रोजी या प्रकरणातील तक्रार मिळाली. त्यानंतर विभागाचे कर्मचारी संबंधित तक्रारदाराच्या संपर्कात होते. तक्रारदाराच्या मार्फतच लाचलुचपतचे कर्मचारी सापळा रचण्याची तयारी करत होते. मात्र, चार दिवस सोमनाथ पोतदार याने तक्रारदाराची भेट नाकारली. त्यानंतर ‘तुम्ही १२ तारखेला,’ या असा निरोप पोतदारने तक्रारदाराला दिला. हाच निरोप लाचलुचपतच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर गुरुवार, दि. १२ मे रोजी सकाळीच सापळा रचण्यात आला. त्यानुसार तक्रारदाराकडे नोंदणी केलेली रक्कम सुपूर्द करण्यात आली. ही रक्कम घेऊन तक्रारदार जेवणाच्या वेळेआधी शासकीय रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर सोमनाथ पोतदार याच्या टेबलावर जाऊन त्यांनी रुग्णालयाचे नोंदणी नूतनीकरण प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपये दिले. ही रक्कम स्वीकारून खिशात घातल्यानंतर जिल्हा रुग्णालयातच ‘लाचलुचपत’च्या कर्मचाऱ्यांनी पोतदारला ताब्यात घेतले. पोतदार याच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौंडा यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा विभागाने केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक वैशाली पाटील करत आहेत. (प्रतिनिधी) ‘भरला डबा’ सोडून उपाशीपोटी ‘आत’ जिल्हा रुग्णालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सकाळी लवकर झाली. त्यामुळे सोमनाथला जेवताही आले नाही. पोतदारला ताब्यात घेऊन लाचलुचपतचे पथक तिथून निघाले, तेव्हा घरून आणलेला त्याचा डबा तसाच दिवसभर टेबलाजवळ राहिला. खरेतर, पोट भरेल एवढा पगार सरकारकडून मिळत असतानाही केवळ पैशाच्या हव्यासापायी ‘भरला डबा’ सोडून उपाशीपोटी ‘आत’मध्ये जाण्याची पाळी या महाभागावर आली.
‘सिव्हिल’चा लाचखोर वरिष्ठ लिपिक जाळ्यात !
By admin | Published: May 12, 2016 10:10 PM