वाई : एका क्लार्कच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामीण रुग्णालयाच्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा मनोदय व्यक्त केल्याने वाईत खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही अधिकारी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नामुळे वाई ग्रामीण रुग्णालयाला लाभले आहेत.रूग्णालयातील कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारीपद रिक्त असल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते़ परंतु आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांतून सांगलीचे डॉ़ अजय पाटील व पुण्याचे डॉ़ मंगेश खांडवे हे वैद्यकीय अधिकारी मिळाले़. डॉ़ पाटील हे स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने त्यांनी दोन महिन्यांत पंचवीस महिल्यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या़ त्यामुळे बरेच दिवस वैद्यकीय अधिकाऱ्याविना गैरसोयीने ग्रासलेल्या वाई ग्रामीण रूग्णालयाविषयी नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली. मात्र, त्याच वेळी रूग्णालयात असणाऱ्या दीपेंद्र फडतरे या क्लार्कने संपूर्ण यंत्रणा वेठीस धरल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून दोघांसह सर्व कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषदेत राजीनाम्याची तयारी दर्शविली. वाईचे नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी जिल्हा शल्यचिकित्सक श्रीकांत भोई यांच्याशी संपर्क साधून या अनागोंदी कारभाराविषयी जाब विचारला. कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तणूक, प्रत्येक गोष्टीत कमिशन मागणे, अपंग कर्मचारी विद्या जाधव यांच्याशी अश्लाघ्य भाषेत वक्त्यव्य, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत गैरसमज पसरवून देऊन त्यांचे दोन महिन्यांचे वेतन काढून देण्यास टाळाटाळ करणे, असा गोष्टी फडतरे यांनी केल्या; मात्र तरीही जिल्हा रूग्णालयाच्या वरिष्ठांनी त्यांची सोयीनुसार बदली करून वाईतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अडचणीत भर घातली, असे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या गोष्टींच्या निषेधार्थ शुक्रवारी वैद्यकीय अधिकारी पाटील व खांडवे यांनी पत्रकार परिषदेत राजीनामे सादर करून खळबळ उडवून दिली. फडतरे यांच्याविषयी तक्रारींचा पाढाच त्यांनी वाचला. जेमतेम दोन महिन्यांपूर्वी वैद्यकीय अधिकारीपद स्वीकारलेले डॉ़ पाटील यांची वरिष्ठांकडून सोमवारी सातारा व गुरूवारी सोमर्डी (ता. जावली) या ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्यासाठी बदली करून मानसिक त्रास देण्यात आला़ तसेच वाई ग्रामीण वैद्यकीय अधिकारीपद काढून महाबळेश्वरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ एऩ एस़ तडस यांच्याकडे कार्यभार सोपवून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फडतरे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. फडतरे यांची कायमस्वरूपी बदली न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. (प्रतिनिधी)
क्लार्कमुळे डॉक्टरांचा ‘एक्झिट’चा पवित्रा
By admin | Published: December 04, 2015 10:00 PM