आदर्की : फलटण पश्चिम भागातील डोंगरी भागातील आळजापूर जिल्हा परिषद शाळेत गतवर्षी आठवीचा वर्ग सुरू केला; परंतु दोन वर्षांपासून आठवीच्या वर्गाला शिक्षकच नाही, त्यामुळे शिक्षक पाच, वर्ग आठ अन् खोल्या सात, अशी अवस्था असल्याने पालक वर्गांतून संताप व्यक्त होत आहे. आळजापूर, ता. फलटण येथे पहिले ते सातवीपर्यंत वर्ग सुरू होते; परंतु शिक्षकांची कमतरतेमुळे पालक वर्ग मुलांना शहरात शाळेत पाठवू लागले. तर इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा मुलांना शिक्षणासाठी घरापासून शाळेत घेऊन जाऊ लागल्यामुळे शाळेचा पट कमी झाला. जिल्हा परिषद शाळा इंग्रजी शाळेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी गतवर्षी सेमी आठवीचा वर्ग सुरू केला; पण वर्षभर शिक्षकाची आठवीच्या वर्गावर नेमणूक केली. यावर्षी शिक्षकाची नेमणूक होईल, या आशेवर पालकांनी पाल्यांना आठवीच्या वर्गात पाठवले; पण शाळा भरून आठ महिने झाले तरी शिक्षकांची नेमणूक केल्याने आठ वर्गास पाच शिक्षक १३० विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. त्यामुळे शिक्षकांना त्रास तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षण विभागाने शिक्षकांची नेमणूक तातडीने करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वर्ग आठ, खोल्या सात अन् शिक्षक मात्र पाच!
By admin | Published: February 22, 2016 12:04 AM