सातारा : शासकीय कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवा ठेकेदारांकडे सोपवण्याचा घाट घातला जात आहे. रिक्त पदे न भरता व्युपगत करण्याचे धोरण सुरू आहे. चतुर्थ श्रेणी संवर्ग संपवण्याचे धोरण राज्य शासन अवलंबत आहे, त्याच्या निषेधार्थ दि. २७ रोजी काळ्या फिती लावून काम करून निषेध करण्यात येणार आहे, तर दि. २९ रोजी लाक्षणिक संप पुकारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सातारा जिल्ह्याचे पदाधिकारी प्रकाश घाडगे, सुलेखा चव्हाण, महेश गुरव यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भाऊसाहेब पठाण म्हणाले, राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या अनेक वर्षे प्रलंबित आहेत. मागण्या सोडविण्यासाठी वारंवार मंत्रीमहोदयांचा वेळ मागितला होता. सातत्याने पाठपुरावा करत आहोत. तथापि, अद्यापही शासनाकडून दखल घेतली गेली नाही. वर्ग ४ ची रिक्त पदे निरसित करू नयेत, चतुर्थ श्रेणीची २५ टक्के पदे निरसित करण्याबाबत १४ जानेवारी २०१६ चा शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, शासकीय कार्यालये, रुग्णालयांचे खासगीकरण रद्द करा, अनुकंपा तत्त्वावरील भरती विनाअट करावी, राज्यातील वारसा हक्काची सर्व पदे तत्काळ भरावीत, सेवानिवृत्त होणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घ्यावे, सर्व शासकीय कार्यालयातील चतुर्थ श्रेणी रिक्त पदे सरळ सेवेने भरावीत, आदी मागण्यांसाठी दि. २७ रोजी काळ्या फिती लावून काम करण्यात येईल. दि.२८ रोजी काळ्या फिती लावून काम करून दुपारी १ ते २ या जेवणाच्या सुट्टीत निदर्शने आणि दि. २९ रोजी लाक्षणिक संप पुकारण्यात येणार आहे, असा इशारा दिला आहे.