माणिक डोंगरेमलकापूर : आनंदनगरी आगाशिवनगर येथील दहावीचा विद्यार्थी कोयना नदीत पोहायला गेला असता नदीपात्रात बुडाला. शाळेत दहावीचा निरोप समारंभ झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच ही दुर्घटना घडली. बुडालेल्या मुलाचे शोधकार्य सुरू आहे. राहुल गणेश परिहार (वय १६, रा. आनंदनगरी, आगाशिवनगर, मलकापूर, ता. कऱ्हाड) असे त्याचे नाव आहे.घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, गणेश परिहार हे पत्नी दोन मुलांसमवेत आनंदनगरी, आगाशिवनगर, मलकापूर येथे वास्तव्यास आहेत. मुलगा राहुल मलकापूरच्या आनंदराव चव्हाण विद्यालयात दहावीत शिकत आहे. २ मार्चपासून बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. शनिवार, दि. २५ रोजी शाळेत दहावीचा निरोप समारंभ झाला. परीक्षेपूर्वी सुटी लागल्याने राहुल हा रविवारी दुपारी आगाशिवनगर येथे जाधव पाणवठ्यावर कोयना नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना तो अचानक बुडाला. यावेळी नदी परिसरात असलेल्या इतर मुलांनी राहुल बुडत असल्याचे पाहिले. मात्र आसपास चांगला पोहणारा कोणीही नसल्यामुळे मुलांनी तत्काळ त्याच्या घरी जाऊन राहुल बुडाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली.यावेळी राहुलच्या कुटुंबीयांनी नदीपात्राकडे धाव घेऊन राहुलचा शोध घेण्याचे काम सुरू केले. मात्र, रविवारी व सोमवारी शोधकार्य राबवूनही राहुल सापडला नाही.
Satara News: पोहताना दहावीचा विद्यार्थी कोयना नदीत बुडाला, शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 5:26 PM