महाबळेश्वर : केंद्र्र शासनाच्या स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र स्पर्धेत अव्वल स्थान पटकविण्यासाठी महाबळेश्वर पालिकेने स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून प्रशासनाच्यावतीने शहरातील भिंतीही रंगविण्यात आल्या आहेत. चित्रांच्या माध्यमातून प्लास्टिक तसेच स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या भिंती आता नागरिकांसह पर्यटकांमध्ये जनजागृती करू लागल्या आहेत.
महाबळेश्वर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानात सहभाग घेतला आहे. या अभियानअंतर्गत महाबळेश्वर पालिका अनेक कामांमध्ये आघाडीवर असून देशात अव्वल येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. रात्री व दिवसा दोन टप्प्यात शहरात स्वच्छतेचे काम सुरू आहे.
आजपर्यंत या अभियांनतर्गत शहरातून कैक टन कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. सर्वत्र स्वच्छतेचा संदेश देणारे फलकही दिसू लागले आहेत. नागरिकांमध्ये प्रबोधन करीत असतानाच आता पालिकेने पर्यटकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी शहरातील प्रमुख व उपमार्गावरील भिंती स्वच्छतेच्या संदेशाने नटविण्यात आल्या आहेत.