कऱ्हाड : स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ या स्पर्धेत देशातील एक लाख लोक संख्येच्या चार हजाराहून अधिक पालिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कऱ्हाड पालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. स्वच्छतेतील सातत्य राखल्यामुळे पालिकेने राज्यात यश मिळविले आहे.कऱ्हाड पालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले गेले. त्यासाठी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह सर्व नगरसेवक,नगरसेविका व शहरातील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.
चालता बोलता कचरा उचला स्पर्धा तसेच स्वच्छ वॉर्ड स्पर्धा, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अशा स्वच्छतेबाबत केलेल्या उपाययोजनांमुळे आज कऱ्हाड शहर स्वच्छ व सुंदर असल्याचे दिसत आहे.कऱ्हाड पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण नियोजन व परिश्रमामुळे पालिकेने राज्यात पहिला क्रमांकांचा बहुमान प्राप्त केला आहे. मंगळवारी याबाबत पालिकेस माहिती प्राप्त झाल्यानंतर पालिका पदाधिकारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच कर्मचारी यांच्यावतीने आनंद साजरा करण्यात आला.