कोपर्डे हवेली/सातारा, दि. ६ : येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत स्वच्छता, पाणी विभाग आणि शिक्षण विभागाच्या वतीने स्वच्छता मतदान हा उपक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देण्यात आले. विद्यार्थ्यांनी मतदानात सहभाग नोंदवला.
कोपर्डे हवेली शाळेत या उपक्रमाची मांडणी मतदान केंद्रासारखी करण्यात आली होती. मतपेटी, मतदार यादी, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान प्रतिनिधी, बोटाला लावण्याची शाई, रांगेत उभे राहून मतदान करणे आदी व्यवस्था करण्यात आली होती. मतदानाची वेळ सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत होती.
मतदानापूर्वी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व्ही. एम. गायकवाड, शिक्षणविस्तार अधिकारी आनंद पळसे यांच्या उपस्थितीत ह्यस्वच्छता ही सेवाह्ण अशी शपथ घेण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक गंगाराम मोरे, उपसरपंच नेताजी चव्हाण, सदस्य लक्ष्मण चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव चव्हाण, युवा मंचचे संदीप चव्हाण आदींची उपस्थिती होती. मतदान प्रक्रिया शिक्षिका नलिनी जगताप, रंजना वाघमारे, अंजली देसाई, लता यादव, सुदर्शना पवार, नंदिनी बागुल, आर. ए. भिलवडे यांनी पार पाडली.
या मतदानातून जेवणापूर्वी हात धुता का, घरी शौचालय आहे का, परिसराची स्वच्छता कशी ठेवाल, याबाबतचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले.