वीज ग्राहकांना दणका
सातारा : सातारा जिल्ह्यात महावितरणचे घरगुती, वाणिज्यचे ७ लाख ५३ हजार ६२८ ग्राहक आहेत. एप्रिल २०२०पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांची संख्या १ लाख ४३ हजार ३९८ आहे. ज्या ग्राहकांनी वर्षभरात एकदाही बिल भरलेलं नाही त्यांची जोडणी तोडण्याची कारवाई महावितरणने सुरू केली आहे. आत्तापर्यंत १० हजार ३०० थकबाकीदारांची वीज तोडण्यात आली आहे.
‘वंचित’चे शुक्रवारी धरणे
सातारा : वंचित बहुजन आघाडीकडून दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ व गेले ९० दिवस सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतलेल्या केंद्र सरकारच्या निषधार्थ एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सातारा जिल्हयातील ११ तालुक्यांमधील तहसील कार्यालयांसमोर शुक्रवार, ५ रोजी हे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिली.
यात्रांवर कोरोनाचे संकट
सातारा : गेल्यावर्षी ऐन यात्रा-जत्रांच्या हंगामात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे सर्वच यात्रा, जत्रा रद्द झाल्या होत्या. डिसेंबर अखेरपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला. त्यामुळे यावर्षी यात्रा, जत्रांचा हंगाम बहरणार, अशी अशा लागून राहिली होती. मात्र, फेब्रुवारीपासून कोरोनाने पुन्हा हातपाय पसरले आहेत. त्यामुळे यावर्षीही यात्रा, जत्रा रद्द झाल्याने ग्रामस्थांचा हिरमोड झाला आहे.
फोडलेले दुभाजक धोकादायक
सातारा : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील लिंबफाटा परिसरातील गौरीशंकर कॉलेजसमोर फोडलेल्या दुभाजकामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. संबंधित यंत्रणेने हा दुभाजक तत्काळ बंद करावा अन्यथा होणाऱ्या जीवितहानीची जबाबदारी या यंत्रणेने घ्यावी, असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे.
तुकाईवाडीची यात्रा रद्द
सातारा : तुकाईवाडी (ता. सातारा) येथील ग्रामदैवत श्री तुकाईदेवीची वार्षिक यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रद्द करण्यात आल्याची माहिती सरपंच संजय पवार व उपसरपंच सुरेश कारंडे यांनी दिली. कोरोनाचे नियम पाळून यात्रेतील धार्मिक कार्यक्रम ७ आणि ८ मार्च राेजी पार पडणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.