सातारा : पावसाळ्यात कमाल तापमान २५ अंशांच्या खाली येते. पण, गेल्या काही दिवसांपासून पावसाची दडी असल्याने कमाल तापमान ३२ अंशांवर गेले आहे. यामुळे पावसाळ्यात उन्हाचा चटका जाणवत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे जाते. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांचा विचार करता कमाल तापमान ४२ अंशांवर पोहोचले होते. पण, यंदा उन्हाळा जाणवलाच नाही. कारण, कमाल तापमानाने एकदाही ४० अंशांचा टप्पा पार केला नाही. साताऱ्यात ३९ अंशावरच दोन वेळा तापमान गेले होते. त्यातच या वर्षी वेळेवर माॅन्सूनचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे कमाल पारा २५ अंशाच्याही खाली आला होता. पण, गेल्या काही दिवसांत पावसाने दडी मारली आहे. यामुळे कमाल तापमान वाढतच चालले आहे. दुपारच्या सुमारास ऊन पडत आहे. तसेच उकाडाही चांगलाच जाणवतोय. रात्रीच्या वेळी तर पंखे सुरू करुन झोपण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कमाल तापमान उतरू शकते. तोपर्यंत तरी सातारकरांना उकाड्याला सामोरे जावे लागणार आहे.
चौकट :
सातारा शहरातील कमाल तापमान असे :
दि. २५ जून २७.०३, २६ जून ३०, २७ जून २६.०२, २८ जून ३१.०४, २९ जून ३१.०६, ३० जून ३०.०८, दि. १ जुलै २९.०९, २ जुलै २९.०८, ३ जुलै ३१.०५, ४ जुलै ३२.०४, ५ जुलै ३२.०४, ६ जुलै ३२.०१
..................................................