कऱ्हाड : शहर व तालुक्यात गत आठ दिवसांपासून दुपारनंतर वातावरणात बदल होत आहे. दुपारी चारनंतर आकाशात ढग जमा होऊन पावसाची चिन्हे निर्माण होत आहेत. सोसाट्याचा वारा, वीज व त्यानंतर जोरदार पाऊस असे वातावरण निर्माण होत आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडून हवेत गारवा निर्माण होत आहे. पावसामुळे दिवसभर जाणवणारा कडक उष्मा रात्री जाणवत नसून वातावरण थंड राहत आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
कऱ्हाड : शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने पोलिसांनी जप्त केली असून, वाहतूक शाखेत ती लावण्यात आली आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
यशवंतनगरमध्ये दहा चालकांवर कारवाई
कऱ्हाड : कऱ्हाड ते मसूर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर तळबीड पोलिसांनी यशवंतनगर परिसरात कारवाई केली. पोलीस अधिकारी महेश शिंदे, एच. आर. घेवर, मोहिते, ए. टी. कुंभार यांनी दहा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या काळात विनाकारण फिरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, तरीही विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
अंतर्गत रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग
कऱ्हाड : येथील अंतर्गत पेठांमधील चौकात कचऱ्याचे ढीग साचत आहेत. पालिकेची घंटागाडी सकाळी एकदाच येऊन गेल्यानंतर दिवसभर नागरिक चौकातील रस्त्याकडेला कचरा टाकत असून, त्यातून ढीग साचत आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. पालिकेने याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे. पालिकेची घंटागाडी सकाळी व संध्याकाळी अंतर्गत पेठांमध्ये पाठविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
गावोगावच्या फ्युजबॉक्सची दुर्दशा
तांबवे : कऱ्हाड ते पाटण मार्गावर रस्त्याकडेला अनेक ठिकाणी असलेले फ्युजबॉक्स उघडे पडलेले आहेत. काही ठिकाणी हे बॉक्स अक्षरश: जमिनीला टेकले आहेत; तर काही ठिकाणी फ्युजाही गायब झाल्या असून, तारांवर खेळ सुरू आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून, वीज वितरणने धोकादायक फ्युजबॉक्स हटविण्याची मागणी होत आहे.
कोळे विभागात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला
कुसूर : कोळे (ता. कऱ्हाड) परिसरात मोकाट श्वानांच्या उपद्रवात वाढ झाली असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या मोकाट श्वानांनी परिसरातील काही गावांमध्ये १० दिवसांत अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने तत्काळ या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाटण मार्गावरील बसथांबे उद्ध्वस्त
मल्हारपेठ : कऱ्हाड-नवा रस्ता दरम्यान मार्गावर एकही झाड शिल्लक राहिलेले नाही. उभे असणारे बसथांबेही भुईसपाट झाले आहेत. कऱ्हाड-पाटण या ३४ किलोमीटर अंतरातील अनेक थांबे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. या मार्गावर बसथांबे उभारण्याची मागणी होत आहे.