सातारा : संपूर्ण जग हे विकासाच्या मागे लागले आहे. गरजा भागवण्यासाठी निसर्गाची हानी केली जात आहे. कार्बनडाय ऑक्साईड तसेच मिथेन वायूचे प्रमाणापेक्षा जास्त उत्सर्जन होते आहे. पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस भयानकरित्या वाढत आहे. संपूर्ण जगभर वातावरणात होणारे घातक बदल हे मानव जात नष्ट होण्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे वेळीच सावध होऊन यावर उपाययोजना शोधली पाहिजे,’ असा सूर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक व लायन्स क्लब सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्लोबल वॉर्मिंग- ग्लोबल वॉर्मिंग’ या परिसंवादातून निघाला.
जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, अभिनेते सयाजी शिंदे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, लायन्स क्लबचे प्रांतपाल सुनील सुतार, प्रांतीय चेअरमन डॉ. शेखर कोवळे उपस्थित होते.
शहरे गॅस चेंबर्स झालीत : वंदना चव्हाण
अमेरिका हा सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करणारा देश आहे. जगातील महाशक्ती असणारा देश ते मान्य करायला तयार नाही. मात्र त्याचा तोटा भारत आणि बांगलादेश यांनाही होतोय. कार्बन, मिथेन या घातक वायूंमुळे काही दिवसांनंतर तर जगणे मुश्कील होईल. या दोन्ही वायूंचे उत्सर्जन कमी करावेच लागेल. युनायटेड नेशन्सने ‘पॅरिस करार’ केलेला आहे. त्यामध्ये प्रत्येक देशाकडून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना करण्यात येतील, याबाबतची वचनबद्धता करून घेतली आहे. भारताने कोळसा जाळण्यावर मर्यादा आणू, सोलर पॅनल बसवू, तसेच कार्बन शोषून घेण्यासाठी झाडे लावू, असे वचन लिहून दिले आहे. आता सर्वांनी मिळूनच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. शहरे गॅस चेंबर्स होऊ लागल्याने आपल्यालाही वाहनांचा वापर टाळून सायकलचा वापर करावा लागणार आहे.
मुंबई सायकलिंग शहर करावे- अभिनेता आमिर खान
आपल्या देशातील महानगरांत मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाची चिंता भेडसावत आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू या शहरांमध्ये वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जास्त आहे. त्याचा त्रास तेथील नागरिकांना होतो. मी मुंबईमध्ये सायकल चालवतो. मात्र वाहनांच्या गर्दीतून सायकल चालवताना अवघड जाते. मुंबई शहरामध्ये सायकलिंग ट्रॅक तयार केले, तर सायकल वापरणाऱ्यांची संख्या वाढेल आणि कार्बन उत्सर्जनावर मर्यादा आणता येईल.
समुद्राची वाढत जाणारी पातळी धोकादायक : डॉ. गुरुदास नूलकर
हवामानामध्ये घातक बदल होत आहेत. तापमान वाढत आहे. पुढील ५० वर्षांत तापमान ४ अंश सेल्सिअसने वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा परिणाम हिमनद्या वितळतील प्रचंडरित्या पाणी टंचाई जाणवेल. समुद्राच्या पातळीत वाढ होईल. समुद्राकाठची शहर समुद्रात जातील. शेती उत्पन्नात घट होईल तसेच शेतीची नासाडी होईल. संपूर्ण अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होईल, त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
नगदी पिकांना विष घालतोय- मृण्मयी देशपांडे
आम्ही सध्या सातारा जिल्ह्यातील धावडी गावात राहतोय. या ठिकाणी रात्रीच्या वेळी डोंगराला वनवे लागल्याचे पाहायला मिळते. त्यांच्यामध्ये प्रबोधनासाठी वाटचाल सुरू आहे. पिकांसाठी वापरण्यात येत असलेली औषधे ही विषद्रव्ये आहेत. त्यामुळे त्याचा वापर टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत.
प्रत्येक जिल्ह्यात जैविक मिशन काढावे- पोळ
जमिनीत आढळणारा गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे, मात्र उसाची पाचट जाळत असताना आपण हा मित्रदेखील जाळून टाकतो. आपल्याकडील पशुसंवर्धन शास्त्रज्ञांचा वापर करून घेतल्यास शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल. विषमुक्त शेती होणे आवश्यक आहे. कॅन्सर रुग्णालयमध्ये विषारी भाज्या खाल्ल्यामुळे कॅन्सर झालेले लोक जास्त प्रमाणात येत आहेत.