कातरखटाव : कातरखटावसह परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने आठ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. यामुळे बाजारपेठामध्ये शुकशुकाट दिसत आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांत कातरखटावमध्ये रुग्णसंख्या शंभरी ओलांडून पुढे चालली आहे. बाधित सापडत आहेत अशा ठिकाणी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत समितीच्या वतीने परिसर पूर्णपणे सील केला आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाइन करण्याचे काम आरोग्य विभाग, समिती युद्धपातळीवर करीत आहे. कोरोना महामारीची साखळी तोडायची असेल तर नागरिकांनी खरंच सतर्क राहणं गरजेचं आहे.
नागरिक बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपली व आपल्या कुटुंबाची टेस्ट करून घेणे फार गरजेचं आहे. काही कुटुंब लगेच तपासून घेतात. मात्र, गावात व खेड्यापाड्यात काहीजण असे आहेत की ‘मला काय होत नाही. मी सशक्त आहे. मला काही त्रास होत नाही,’ असे म्हणून पळवाटा काढतात. उगाच इकडे-तिकडे मोकाट फिरत असतात आणि आपल्या कुटुंबासह दहा, वीस जणांच्या संपर्कात येऊन संसर्ग वाढवतात. त्यामुळे साखळी तुटण्याऐवजी लांबत चाललेली दिसत आहे. गावोगावी ग्रामपंचायत, समितीच्या बैठका होऊन जनता कर्फ्यू कडक बंद ठेवून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली तरच रुग्णसंख्या कमी होईल, अन्यथा साखळी तुटणे कठीण होईल, असे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वैशाली चव्हाण यांनी सांगितले.
चौकट
पाच हजार रुपये दंड
कोरोना महामारीने सगळीकडे डोकं वर काढलं आहे. त्यामुळे कातरखटावमध्ये आठ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. यादरम्यान व्यावसायिकांनी व नागरिकांनी नियमाचे उल्लंघन करू नये. अन्यथा पाच हजार रुपये दंड करण्यात येईल, असा निर्णय ग्रामसमितीने घेतला आहे.
चौकट
अन्यथा कडक कारवाई
लॉकडाऊन व जनता कर्फ्यू काळात सर्वांनी दुकाने बंद ठेवून नियमाचे पालन करावे. नागरिकांनी कारण नसताना रस्त्यावर फिरू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी दिला आहे.
फोटो विठ्ठल नलवडे यांनी मेल केला आहे.
ओळ कातरखटाव येथे पाळलेल्या जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. (छाया : विठ्ठल नलवडे.)