सातारा : शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये गेल्या काही दिवसांपासून बंदिस्त गटाराचे काम सुरू आहे. पालिकेने कोणताही कार्यारंभ आदेश दिला नसताना हे काम सुरू असल्याचा आरोप अनिकेत तपासे यांनी केला आहे. दरम्यान, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, खोदकामाचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
याबाबत तपासे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मल्हारपेठ येथील प्रभाग क्रमांक सातमध्ये बंदिस्त गटाराचे काम सुरू आहे. हे काम करताना सर्व नियम पायदळी तुडविण्यात आले आहे. गटारावर सिमेंटचे अस्तिरीकरण न करता खोदकाम करून थेट पाइपलाइन बसविण्यात आली आहे. जे काम झाले आहे ते निकृष्ट दर्जाचे असून, काही ठिकाणी तुुटलेल्या पाइनलाइन वापरण्यात आल्या आहे. गल्लीबोळात केलेल्या खोदकामामुळे वयोवृद्ध नागरिकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
हे काम पूर्ण करण्याबाबत संबंधित नगरसेवकाशी संपर्क केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे नागरिकांना दिली जातात. या कामाबाबत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना लेखी निवेदन देण्यात आले असून, कामाचे त्रयस्थ समितीकडून ऑडिट करावे, अशी मागणी केली आहे. मुख्याधिका यांनीदेखील ऑडिट करण्याचे लेखी कळविले असून, याबाबतची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी तपासे यांनी केली आहे.
(कोट)
गेल्या चाळीस वर्षांत झाली नाहीत एवढी कामे आम्ही प्रभागात केली आहेत. शासनाकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला. प्रभागात चांगल्या पद्धतीने सुरू असलेल्या कामांना खो घालून राजकारण करण्याबरोबर नाही. काही कामे जरूर अपूर्ण आहेत. मात्र ती मार्गी लावण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
- विनोद खंदारे, नगरसेवक
फोटो : २८ जावेद खान ०१
साताऱ्यातील मल्हारपेठ येथे बंदिस्त गटाराचे काम अर्धवट अवस्थेत असून, ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (छाया : जावेद खान)