तरडगाव : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. दिवसेंदिवस बळींची व बाधितांची संख्या वाढतच आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ठप्प आहे. गेल्या वीस दिवसांपासून केशकर्तनालये देखील बंद आहेत. वाढलेली केसदाढी नागरिक आता स्वत:च घरी करीत आहेत. सलूनमधील कारागिराप्रमाणे तरुणांना ही हेअरस्टाईल करणे जमत नसल्याने बरेचजण टक्कल करत असल्याचे चित्र गावोगावी पाहावयास मिळत आहे.
दैनंदिन जीवनात कितीही ताणतणाव आला तरी प्रत्येकाला आपले राहणीमान व्यवस्थित असावं, असं वाटतं. एरव्ही सलून दुकानात एखाद्याची केसदाढी झाल्यावरही तो ग्राहक कारागिराला ह्यअरं इथं बघ थोडसं राहिलंय,ह्णअसे म्हणताना अनेकदा दिसतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनच्या काळात केशकर्तनालय बंद असल्याने केसदाढीकडे बारकाईने बघायला कुणाला वेळ मिळेना. काहींनी कधी नव्हे ती स्टाईल म्हणून दाढी वाढविली आहे. ज्यांना केस दाढी वाढलेले अजिबात चालत नाही, असे लोक घरीच इलेक्ट्रिक मशीनद्वारे डोक्याचे केस व दाढी करण्याचा प्रयोग करीत आहेत.
अनेक दिवस सलून दुकाने बंद राहिल्याने अनेकांनी त्यास पर्याय म्हणून मेडिकलमधून दाढी करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी केले. सद्य:स्थितीत आता हे साहित्यही मिळेनासे झाले आहे. अनेकांनी इलेक्ट्रिकमशीनच्या साह्याने टक्कल करणे पसंत केले आहे. मात्र, शालेय मुले या बाबतीत नाक मुरडत असून, त्यांचे केस घरी कापताना त्यांची स्टाईल बिघडून जात असल्याने कुटुंबात चांगलाच हशा पिकत आहे. शेवटी स्टाईल बिघडल्याने टक्कल करणे भाग पडत आहे.व्यावसायिकांनी घरी जाऊन दाढी करू नयेलॉकडाऊनच्या काळात स्वत:ची दाढी विशेषत: टक्कल घरी करण्याचा ट्रेंड हा सर्वत्र पाहावयास मिळत आहे. तरी काही व्यावसायिक हे फोन कॉलवरून ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांना ज्यादा दरात सेवा देत आहेत. तर काहींना आपल्या घरी बोलावत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे व्यावसायिकांनी असे प्रकार थांबवून आदेशाचे उल्लंघन न करता प्रशासनास सहकार्य करावे, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत.अशाही वेगळ्या स्टाईलला पसंतीकाही युवकांनी टक्कल केले आहे. मात्र, दाढी तशीच वाढलेली ठेवल्याचे दिसत आहे. टक्कल करण्याबरोबर युवकांमध्ये ही अशी एक वेगळी स्टाईल काही प्रमाणात पाहावयास मिळत आहे. पूर्वी टक्कल कोणी केला तरी बाहेर फिरणे टाळले जात. डोक्यावर टोपी परिधान करून वावरत असत. सध्याच्या युगात युवक वर्गामध्ये असे अनेक वेगवेगळे लूक ठेवण्याची पद्धत उदयास आल्याचे दिसत आहे.