सातारा : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे खूप चांगले मित्र आहेत. ही मैत्री पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडची आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही सत्तेत नसतानाही मुख्यमंत्र्यांनीच या मैत्रीपोटी साताऱ्याचा खरा विकास केला. याउलट राष्ट्रवादीत नुसतं आडवा-आडवी आणि जिरवा-जिरवीच झाली,’ असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
सत्तेसाठी लाईन लावून उभं राहणं माझ्या स्वभावात नाही, असं स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले, ‘राजकारणात माझी बांधिलकी कायम माझ्या मतदारसंघाशी राहिली आहे. सत्ता असो नसो जनतेच्या सेवेत वाहून घेण्याचा माझा स्वभाव आहे. त्यामुळे भाजपाकडे सत्ता आहे म्हणून मी तिथं जाईन असा तर्क काढणं चुकीचं आहे. योग्य वेळी सातारकरांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे, त्यामुळे आता कोणीही कसलेही तर्कवितर्क काढू नये.
भाजपा प्रवेशाविषयी बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘रामराजे नाईक-निंबाळकर राजे आहेत. आमची आणि त्यांची कुठंच बरोबरी होऊ शकत नाही. ते वयाने आणि मानाने मोठे आहेत. त्यामुळे माझा त्यांच्याशी संबंध जोडू नका. ते आणि शिवेंद्रराजे त्यांच्या मार्गाने कुठंही जातील.’
आमची स्वत:ची जत्राच असताना यात्रा कशासाठी!साताऱ्यात बुधवार, दि. २८ रोजी दाखल होणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेतील सहभागाविषयी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, ‘आता सगळीकडेच यात्रा निघाल्या आहेत. आमची स्वत:ची जत्रा असताना आम्ही या असल्या यात्रांमध्ये का सहभागी होऊ?’
रामराजे, शिवेंद्रराजे बिग पिपल!भाजपात दाखल झालेले साताºयाचे माजी आमदार शिवेंद्रराजे भोसले बिग पिपल आहेत. त्यामुळे त्यांचा विषय खूपच वेगळा आहे. शेवटी ते माझे धाकटे भाऊ आहेत. त्यांना मदत केलीच पाहिजे ना? ते छोटं मूल आहे, त्यांनी मांडीवर जरी काही केलं तर मांडी कापत नाही आपण. ते लाडके आहेत, दाढी वाढविल्यामुळे आता ते छान दिसतायत. त्यांनी पिक्चरमध्ये काम करावं, तो नक्कीच सुपरहिट होईल,’ अशी टिप्पणीही खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.