शिवथर : सातारा-लोणंद रस्त्यावर आरळे, ता. सातारा हद्दीत कोळसा वाहतूक करणाऱ्या मालट्रकला अपघात झाला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, जयगड रत्नागिरी येथून दगडी कोळसा घेऊन मालट्रक (एमएच ०९ सीसी ८७७७) बारामतीकडे निघाला होता. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास आरळे , ता. सातारा हद्दीतील कृष्णा पुलाच्या उतारावर चालकाला डोळा लागल्याने त्याचा ट्रकवरील ताबा सुटून मालट्रक विद्युत खांबाला धडकला. त्यानंतर ट्रक नाल्यात जाऊन एका बाजूला पलटी झाला. या अपघातात मालट्रकचा चालक साहेबराव यमगर (वय २५, रा. बीड) हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघातामुळे मुख्य वीजवाहक तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला. या अपघातामुळे इलेक्ट्रिक तारा खाली पडल्या. परंतु त्यावेळी तेथे कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. यात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. पुढील उपचारासाठी त्याला सातारा येथे पाठविण्यात आले आहे.
फोटो
०४शिवथर-अपघात
सातारा-लोणंद मार्गावर आरळे हद्दीत मालट्रक चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. (छाया : अजित साबळे)