पुणे : पाण्याअभावी कोयनेची चौथ्या टप्प्यातील विद्युत निर्मिती पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोयनेतील १ हजार ८२० मेगावॅट विद्युत निर्मिती ठप्प होणार असली तरी, राज्यातील विद्युत पुरवठ्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मागणीप्रमाणे वीज उपलब्ध करुन दिली जाईल, असे महावितरणने म्हटले आहे.
सध्या रोज १९ ते १९,५०० मेगावॅट विजेची मागणी आहे. महावितरणकडे झीरो शेड्यूलमध्ये असलेले परळी औष्णिक प्रकल्पामधील संच ६, ७ व एनटीपीसी सोलापूर या औष्णिक प्रकल्पाचा वाटा मिळून एकूण १,१४४ मेगावॅट इतकी अतिरिक्त वीज उपलब्ध आहे. पॉवर एक्सचेंजवर वीज उपलब्ध असल्यामुळे आणि मागणीएवढी विजेची उपलब्धता असल्याने कोयनेच्या वीजनिर्मिती केंद्रामधील टप्पा क्रमांक ४ मधून विजनिर्मिती पूर्णपणे बंद झाली तरीही राज्यात कोठेही भारनियमन होणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले.
कोयना जलविद्युत प्रकल्पामधून १ हजार ९६० मेगावॅट वीज निर्मिती होते. त्यातील १ हजार ८२० मेगा वॅट वीज निर्मिती बंद आहे. या प्रकल्पातील ६०० मेगावॅट क्षमतेचे १ व २ टप्पा चोवीस तास चालवून त्यातून ४० मेगा वॅट आणि ३२० मेगावॅट क्षमतेच्या टप्पा क्रमांक ३ प्रकल्पातून ८० मेगावॅट विजेची निर्मिती केली जाणार आहे. तर, चौथा टप्पा बंद ठेवण्यात येईल.