सातारा : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळे नेतेमंडळी सतर्क झाली असून त्यांनी तर विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटाच लावला आहे. मात्र, यामुळे अनेक विभागातील प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे. अनेकदा या अधिकाऱ्यांना नेत्यांची वाट बघत गावामध्येच मुक्काम ठोकावा लागत आहे. जिल्ह्यात तीन आठवड्यात दोनशेहून अधिक विकासकामांची उद्घाटने झाली आहेत. बहुतांशी भागातील कामे जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे आणि कृषी विभागाकडील आहेत. त्यामुळे या विभागाचे प्रमुख आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडत आहे. उद्घाटन आहे तेथे साहित्य पोहोच करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे.आठही विधानसभा मतदारसंघात आता विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा सुरू आहे. अनेक कामांचे उद्घाटन दोनवेळा होण्याचे प्रकारही काही मतदारसंघात घडले आहेत. राष्ट्रवादीच्या कामांचे उद्घाटन काँग्रेस आणि काँग्रेसच्या कामांची उद्घाटने राष्ट्रवादी करत असल्याच्या आरोपांच्या फैरीही यानिमित्ताने झडत आहेत. ज्या गावात कामाचे उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणी नेत्यांच्या अगोदरच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोहोचावे लागत आहे. अनेकदा नेतेमंडळी मध्यरात्र उलटली तरी उद्घाटनाचा नारळ फोडण्यासाठी येतच नाहीत. जेथे उद्घाटन आहे तेथे गाडी जाते का, आवश्यक ती सोय केली आहे का, याचीही विचारणा केली जाते. उद्घाटनानंतर जेथे कार्यक्रम होणार आहे तेथे टेबल नीट मांडले आहेत का, माणसे किती उपस्थित आहेत. याचाही आढावा घेतला जातो. (प्रतिनिधी)
फोडण्यासाठी नारळ.. अधिकाऱ्यांची धावपळ!
By admin | Published: September 02, 2014 11:46 PM