कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक २१ जून रोजी होत आहे. यंदा तिरंगी लढतीचे चित्र आहे. त्यामुळे तीनशेहून अधिक इच्छूकांनी अर्ज दाखल केलेत. तिनही पॅनेलनी नुकतेच प्रचाराचे नारळ फोडलेत; पण आपल्या पॅनेलचे उमेदवार कोण अन् निवडणूक चिन्ह कुठले, हे मात्र अस्पष्टच आहे. निवडणूकीचे वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल, माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते यांचे ‘रयत’ पॅनेल तर डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांचे ‘सहकार’ पॅनेल रिंग्ांणात पुर्ण तयारीनिशी उतरले आहेत. सहकार पॅनेलने एकट्यानेच शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल कले. पण त्यानंतर प्रचार शुभारंभाच्या सभा मात्र तिघांनीही दणक्यात केल्या. या सभांना इच्छूक उमेदवारांनीही आपापली शक्ती दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही नेत्यांनी सभेमध्ये कुठल्याही उमेदवाराची अधिकृतपणे घोषणा केलेली पहायला मिळाली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करताना संस्थापक पॅनेलने ‘नारळ’ या चिन्हाची आग्रक्रमाने मागणी केली आहे. तर रयत व सहकार पॅनेलने ‘कपबशी’ या चिन्हावर दावा केला आहे. १० जूनपर्यंत अर्ज मागे, घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यादिवशीच पॅनेल निश्चित होईल. त्यानंतर ११ जूनला चिन्हांचे वाटप होणार आहे. नारळ हे चिन्ह संस्थापक पॅनेलने एकट्यानेच मागिल्याने त्यांना ते चिन्ह मिळण्यास अडचण नाही. मात्र ‘कपबशी’ची लॉटरी कोणाला लागणार याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. (प्रतिनिधी) ‘स्वाभिमानी’ नक्की कोणाबरोबर ४शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे पाहिले जाते. कृष्णेच्या निवडणूकीत या संघटनेचा पाठिंबा कोणाला राहणार हे महत्वाचे मानले जाते. शनिवारी सहकार पॅनेलच्या सभेत कऱ्हाड तालुक्यातील स्वाभिमानीच्या सचिन नलवडे, विकास पाटील यांनी भोसलेंना पाठिंबा दिला. तर रविवारी रयत पॅनेलच्या सभेत स्वाभिमानीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष शहाजी पाटील यांनी मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते यांना पाठिंबा जाहिर केला. त्यामुळे स्वाभिमानी नेमकी कोणाबरोबर याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
नारळ फुटले; पण चिन्ह कुठले?
By admin | Published: June 02, 2015 12:28 AM