कोंडवे : गेल्या चार दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून, अवघे जनजीवन गारठून गेले आहे. हुडहुडी भरविणाऱ्या थंडीमुळे कामानिमित्त सकाळी व रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्यांची पंचाईत होत आहे. थंडीपासून बचाव करणाऱ्या स्वेटर, जर्कीनसारख्या ऊबदार कपड्यांच्या खरेदीसाठी शहरातील विक्रेत्यांकडे झुंबड उडाली आहे.राज्याच्या सर्वच भागात थंडीचा कडाका असून, तापमान झपाट्याने घसरत आहे. रविवारी १२ अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली आल्याने कडाक्याच्या थंडीने जिल्हा गारठून गेला. थंडीमुळे सकाळच्या सत्रातील शेतीकामे ठप्प झाली आहेत. रात्री सुद्धा ग्रामीण भागात लवकर सामसूम होताना दिसत आहे. गावा-गावात वस्तीवर शेकोट्या पेटविल्या जात आहेत.थंडीच्या पार्श्वभूमीवर स्वेटर, जर्कीन, स्कार्प, कानटोप्या, हातमोजे आदी ऊबदार कपडे खरेदीसाठी शहरातील दुकानदारांकडे गर्दी होत आहे. साताऱ्यात पंचायत समितीलगतच्या हॉकर्स झोनमध्ये स्थित तिबेटियन विक्रेत्यांकडे स्वेटर खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मागणी वाढल्यामुळे विक्रेते खूश झाले असून स्वेटर, जर्कीनच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. तिबेटियन विक्रेत्यांकडे २५० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत स्वेटर तर ५०० ते १२०० रुपयांपर्यंत जर्कीनच्या किंमती आहेत.शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर सुद्धा फिरत्या विक्रेत्यांकडून स्वेटरची विक्री केली जात आहे. स्वस्तात स्वेटर मिळत असल्याने खरेदीसाठी झुंबड उडत आहे. गेल्या चार दिवसांपासून गिऱ्हाईकांची संख्या अधिक वाढली असून, व्यवसाय चांगला होत असल्याचे तिबेटियन विक्रेती सी. वाँग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
थंडीचा कडाका वाढला, पारा १२ अंशावर
By admin | Published: December 29, 2015 9:59 PM