महाबळेश्वर : थंडीचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये थंड, गरम, दमट, ढगाळ अशा वातावरणामुळे महाबळेश्वरमधील बाजारपेठसहित वेण्णा लेक, लिंगमळा परिसर चांगलाच गारठू लागला आहे. नाताळ व थर्टी फस्टचा हंगाम जवळ येऊ लागल्यामुळे महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ सजू लागली आहे तर हॅाटेल, बंगलो, ढाबे विद्युत माळांच्या रोषणाईने झगमगू लागले आहेत.महाबळेश्वरमध्ये गेल्या चार दिवसापासून थंडीचा जोर वाढू लागला आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजतापासून तापमानात घसरण होऊ लागली. यामध्ये महाबळेश्वर शहरात शालेय सहली व पर्यटकांत मोठ्या प्रमाणात वाढत झाली आहे. थंडी वाढू लागल्याने बाजारपेठेत चांगलीच गर्दी दिसते. वेण्णा लेक परिसरात तापमानाचा पारा ९.२ अंशावर आला असून, शहरात किमान तापमान १२.९ अंश आहे. या थंडीचा आनंद लुटण्यासाठी नवविवाहित दाम्पत्यांचे आगमन जास्त प्रमाणात होते. डिसेंबर महिना सुरू झाल्यानंतर हळूहळू थंडीमध्ये वाढ होते. शनिवार - रविवारपासून सर्वत्र तापमान घसरू लागल्याने कडाका वाढला आहे.महाबळेश्वरमध्येही तापमान ११ च्या खाली आले आहे. वेण्णा लेक परिसरात ९ अंशावर तापमान असल्याने परिसरात पर्यटक नौकाविहार करण्यासाठी तोबा गर्दी करत आहेत. शहरात मात्र थंडीतही मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवसाही हुडहुडी भरू लागल्याने उबदार कपडे घालूनच नागरिक घराबाहेर पडत आहेत. तापमान घसरल्याबरोबरच थंड वारे वाहत असल्याने गुलाबी थंडीचा अनुभव महाबळेश्वरकर घेत आहेत. वेण्णालेक तलाव परिसर, लिंगमळा परिसरात या गारठ्याचे प्रमाण अधिक जाणवत आहे.महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठमध्ये बहुतेक पर्यटक खरेदी करताना शाल, स्वेटर, कानटोपी घालून फिरत होते तर काहींनी गरम कपडे खरेदी करण्याचा आनंद घेतला.
विविध पॉईंट्सवर गर्दीमहाबळेश्वरमध्ये पर्यटकांची रेलचेल असून येथील प्रसिद्ध केट्स पॉईंट, क्षेत्र महाबळेश्वर मुंबई पाॅईंट किल्ले प्रतापगड, लॉडवीक पॉईंट, ही पर्यटनस्थळे गर्दीने गजबजली आहेत. पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत तर मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेल्या नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेकला ''चौपाटी'' चे स्वरूप प्राप्त झाले आहे.
बाजारपेठेत मनसोक्त खरेदीमोठ्या प्रमाणावर पर्यटक खरेदीसाठी बाजारपेठेत प्रसिद्ध चप्पल, चणे, जाम, जेली, येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी, चॉकलेट फज खरेदी करत बाजारपेठेतील आकर्षक वस्तू खरेदीकडे देखील पर्यटकांचा कल असल्याचे पाहावयास मिळत आहे.