सातारा : सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या झळांमुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. अशावेळी थंड पाणी पिण्याचा मोह हा प्रत्येकालाच होतो. पण आपापल्यापरिने प्रत्येकजण उन्हाळ्यात थंड पाणी मिळावे म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतो आणि सोय करत असतो. अशाचप्रकारे वाहनचालकांनीही कापड आणि बारदानानी लपेटून ठेवलेला थंड फिरता झुला वाहन चालकांसाठी वरदान ठरलाय.
उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पाण्यावाचून यातना होतात त्या वाहनचालकांच्या. रात्रं-दिवस त्यांना विविध शहरांमध्ये प्रवास करावा लागतो. प्रवासादरम्यान वाटेमध्ये तहान लागल्यानंतर त्यांना थंड पाणी कोठेही मिळत नाही, त्यामुळे अनेक वाहनचालक पाणी थंड राहावे म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत आहेत. वाहनांमध्ये बाटली भरून पाणी ठेवले तरी ते उन्हाच्या तीव्रतेमुळे गरम होते, त्यामुळे हे पाणी प्यावे, असे वाटत नाही. यासाठी मग वाहनाच्या खालच्या बाजूला चाकाजवळ ट्यूबने एक पिशवी तयार केली जाते. वाहनाची सावली या पिशवीवर पडत असल्याने तसेच हवा लागत असल्यामुळे यातील पाणी थंड राहते. याशिवाय ज्याठिकाणी वाहन विश्रांतीसाठी थांबते तेथे पिशवीवर पाणी टाकले जाते जेणेकरून आणखी पाणी थंड राहावे, यासाठी वाहनचालकांचा प्रयत्न असतो. हे पाणी फ्रिजलाही मागे सारेल एवढे थंड असते. एवढेच नव्हे तर चवदारही असते त्यामुळे वाहनचालक उन्हाळ्यामध्ये थंड पाणी मिळावे म्हणून अशाप्रकारे आपली सोय करतात. काही वाहनचालक तर वाहनाच्या खाली चक्क ट्यूबचा झुला बांधून माठ ठेवतात. मात्र, या माठातील पाणी कापडी पिशवीतील पाण्यासारखे थंड होत नसल्याचे काही वाहनचालकांचे म्हणणे आहे. वाहनचालकांना लांबच्या प्रवासादरम्यान पाण्याची गरज भासतेच. अशावेळी वारंवार विकत पाणी घेऊन त्यांना आपली तहान भागवणे शक्य होत नाही. त्यामुळे मग कापडी पिशवी वाहनाच्या खाली बांधून पाणी थंड ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. विशेषत: ट्रकचालकांकडून पाणी थंड होण्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर केला जातो. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रकचालकांना लांबचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे थंड पाणी मिळावे म्हणून अशाप्रकारे ट्रकचालक आपापल्यापरिने पिण्याच्या पाण्याची सोय करत असल्याचे दिसून येते.