सातारा : सातारा शहरात मागील आठवड्यापासून थंडीचा मुक्काम असून किमान तापमान सतत हे १० ते १२ अंशादरम्यान राहिलेले आहे. काल, बुधवारी तर १२ अंशावर पारा होता. यामुळे सातारकरांना कडाक्याच्या थंडीशी सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर या गारठ्यामुळे जनजीवनावरही परिणाम झालेला आहे.सातारा शहरात अडीच महिन्यांपासून थंडीला सुरुवात झाली. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये थंडीची तीव्रता जाणवली नाही. शहराचा पारा तर सतत १२ अंशावर राहिला होता. मात्र, नवीन वर्ष सुरू झाल्यापासून कडाक्याच्या थंडीशी सातारकरांना सामना करावा लागत आहेत. मागील आठ दिवसांत तर सातारा शहराचे किमान तापमान सतत हे १० ते १२ अंशादरम्यान राहिलेले आहे. त्यातच पाठीमागील मंगळवारी १० अंश पारा नोंद झाला होता. हे तापमान दोन वर्षांतील नीच्चांकी ठरलेले. त्यानंतर गेले आठवडाभर किमान तापमान १० ते १२ अंशादरम्यान असल्याने सातारा शहरात थंडीने मुक्काम ठोकल्याचे चित्र आहे. सकाळच्या सुमारास परिसरात धुके पडत आहे. यामुळे सातारा शहर धुक्यात हरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच कडाक्याच्या थंडीमुळे सकाळी फिरणाऱ्यांच्या संख्याही कमी झाली आहे. शहरातील बाजारपेठेवरही थंडीचा परिणाम झालेला असून सायंकाळी सातनंतर खरेदीसाठी तुरळक लोक दिसतात. तर गारठ्यामुळे उबदार कपडे खरेदीकडे ही लोकांचा कल वाढलेला आहे.थंड हवेच्या पाचगणी आणि महाबळेश्वरलाही थंडीचा कडाका आहे. गेल्या काही दिवसांत महाबळेश्वरचा पारा १२ ते १३ अंशादरम्यान नोंद होत आहे. येथे देश-विदेशातील पर्यटक थंडीचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत. यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास रस्ते तसेच विविध पाॅईंट्सवरती गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
साताऱ्यात आठवड्यापासून थंडीचा मुक्काम, गारठ्यामुळे जनजीवनावर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 6:01 PM