पुसेसावळी : सातारा जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच गंभीर होत चालल्यामुळे लॉकडाऊनचे नियम अधिक कडक झाल्याने चोराडे येथील चोराडे फाट्यावर नाकाबंदी करण्यात आली असून, अत्यंत आवश्यक कारणानेच बाहेर पडणाऱ्याला सूट देण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा धडाका पुसेसावळी पोलिसांनी सुरू केला आहे.
चोराडेसह परिसरातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा सर्वांना विचार करायला लावणारा आहे. त्यामुळे या ठिकाणी सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनाबरोबर या परिसरातील वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. संचारबंदीच्या कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीस कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. दुकानमालकांनी व दुकानात काम करणाऱ्या कामगारांनी लसीकरण व तपासणी करून घेणे बंधनकारक असून, दुकानमालकांनी सुरक्षिततेची काळजी घेऊन उपाययोजना करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
या वेळी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्याकडून विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.