अंगापूरः : बदलत्या काळानुसार नवीन प्रथा निर्माण करून मानवी जीवन सुसह्य करणे ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन येथे दोन वर्षांपासून मृत्यूनंतरच्या विधीत बदल करून त्यांची योग्यरीत्या अंमलबजावणी केली जात आहे. त्याचा एक भाग असणारा भरणी श्राद्ध विधी सलग दुसऱ्या वर्षीही सामुदायिकपणे पार पाडण्यात आला. यामध्ये वर्षभरात मृत्युमुखी पडलेल्या ८९ नागरिकांचे नातेवाईक सहभागी झाले होते.
चतुर्थीला भरणी नक्षत्रावर हिंदू संस्कृतीत भरणी श्राद्ध विधी केला जातो. वर्षभरात ज्याचे आप्तजन मृत्युमुखी पडले अशा व्यक्तींचा भाद्रपद महिन्यात भरणी नक्षत्रावर हिंदू संस्कृतीनुसार भरणी श्राद्ध विधी केला जातो. अशावेळी मोठ्या लोकसंख्येच्या गावात हे विधी पार पाडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी या बदलाची संकल्पना समाजासमोर मांडली. त्यावर विचारमंथन झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी या बदलाला मान्यता दिली. गेल्या वर्षी या सामुदायिक भरणीला सुरुवात झाली होती. यंदाही याबाबतची कल्पना सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळीच साडेआठ ते दहा या वेळेत प्राथमिक शाळेच्या व्हरांड्यात हा विधी केला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार गावातील वर्षभरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे नातेवाईक विधीस लागणारे साहित्य घेऊन उपस्थित होते. सकाळी साडेआठला कोरोना नियमांचे पालन करून विनायक कुलकणी काका यांचे मंत्रोच्चारानुसार विधिवत भरणी श्राद्ध विधी पार पाडण्यात आला.
चौकट
सोशल मीडियाद्वारे जागृती
गावातील प्रमुखांनी चार दिवसांपूर्वी पूजा करणाऱ्यांशी या विधीबाबत यथासार चर्चा केली. त्यानुसार विधीची प्राथमिक माहिती, लागणारे साहित्य, पिंडदान, तसेच अन्य विधी कशाप्रकारे करावयाचे, याबाबतची सर्व माहिती सोशल मीडियाद्वारे सोयीस्कर नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आली होती. त्यामुळे हे विधी सोयीस्कर पार पाडण्यात मोठी मदत झाली.
फोटो २४अंगापूर-भरणी
सातारा तालुक्यातील अंगापूर येथील प्राथमिक शाळेत मंत्रोच्चाराने सामूहिक भरणी श्राद्ध पार पडले. (छाया : संदीप कणसे)