सातारा : कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक योजनेचा भाग म्हणून नागरिकांनी एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणे टाळावे. अतितातडीचे काम असेल तरच कार्यालयात प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एका परिपत्रकाद्वारे काढले आहेत.जिल्हास्तरावर, क्षेत्रीयस्तरावर सर्वसामान्य जनतेस शासकीय माहिती अथवा इतर आवश्यक बाबींसाठी अर्जाद्वारे कार्यवाही करावयाची असेल तर शासकीय कार्यालयात न जाता ई-मेलद्वारे अर्ज करावेत व माहिती प्राप्त करून घ्यावी. यासाठी संबंधित विभागाने सामान्य जनतेसाठी शासकीय कार्यालयातील ई-मेल आयडी व दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना केल्या आहेत. क्षेत्रीय स्तरावरून अत्यंत तातडीचे टपाल, संदेश हे ई-मेलद्वारे पाठविण्यात यावे. सर्वसामान्य जनतेकडून ई-मेलद्वारे प्राप्त होणा-या अर्जांवर नियमानुसार विहित मुदतीत उचित कार्यवाही करून अर्जदारांना कळविणे संबंधित शाखा, विभागांची जबाबदारी राहील.सर्व शासकीय कार्यालयांमध्ये असणा-या कर्मचा-यांनी काम करताना कागदपत्रे व हस्तांदोलन यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कार्यालयांमध्ये वेळोवेळी सॅनिटायझरचा, हँडवॉशचा वापर करावा. शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. तसेच कार्यालयातील कर्मचा-यांनी आपले संकलन तसेच विभागांमध्ये स्वच्छता राखावी. वैयक्तिक सुनावणीस एखादी व्यक्ती गैरहजर राहिली म्हणून प्रकरणे, केस निकाली न काढता त्याला वैयक्तिक हजेरीमध्ये सूट देऊन कोरोना संक्रमण कालावधीनंतर त्या सुनावणीस पुढील तारीख देण्यात यावी. वरील बाबींची अंमलबजावणी ३१ मार्च २०२० या कालावधीतपर्यंत करावी, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.आठवडी बाजार भरवताना घ्या काळजीआडवडे बाजार भरवताना मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही, याची दक्षता जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या मुख्याधिकारी व बाजार समितीच्या सचिवांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.आठवडे बाजारामध्ये ग्रामीण भागातून शहरी भागात येणा-या शेतक-यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे कोरोना संसर्ग ग्रामीण भागाकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवडी बाजारामध्ये कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करावी. यामध्ये दर्शनी भागात फ्लेक्स लावणे, ऑडिओ संदेश, हँडवॉश, सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत सूचित करावे. आठवडे बाजार झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम त्वरित राबवावी. आठवडे बाजारात भाजी, फळे, नाशवंत वस्तू आणि दूध आदी वस्तूंची विक्री करणा-या विक्रेत्यांमध्ये सुरक्षित अंतर राहील, याची खबरदारी घेण्याबाबत सूचित करावे. आठवडे बाजारात शेतकºयांना त्यांच्या शेतात उत्पादित केलेला भाजीपाला, कडधान्ये, धान्य याचीच विक्री करता येईल.
सरकारी कार्यालयात न येण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 2:52 PM