सायगाव : जावळी तहसील कार्यालयात तीन नायब तहसीलदार पदे मंजूर असून केवळ एकच नायब तहसिलदारांवर संपूर्ण तालुक्याचा कारभार सुरू आहे. या कार्यालयातील कनिष्ठ सहायकची बारा पैकी नऊ कार्यरत तर त्यामधील तीन प्रतिनियुक्तीवर तर अव्वल कारकूनची नऊ पदे मंजूर आहेत पैकी आठ कार्यरत तर एक प्रतिनियक्ती वर असे महसूल कर्मचारी फक्त पगाराला जावळीत मात्र कामाला जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी कार्यालयात आहेत. त्यामुळे तहसीलदारांवर अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर तहसीलचा कारभार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेची कामे रखडली जात आहेत. तरी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ मंजूर पदे भरून प्रतिनियक्तीवरील कर्मचारी जावळीत पाठवावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.
एकीकडे शासकीय कामांच्या बाबतीत "झिरो पेंडनसी" चा फॉम्युर्ला आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडून राबविला जात आहे. त्याचा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रत्येक तहसिलदारांकडे पाठपुरावा होताना दिसतो. मात्र दुसरीकडे कमी कमी महसूल कर्मचाऱ्यांवर महसुली कामांचा निपटारा कसा करायचा, हा प्रश्न जावळी तहसीलदारांपुढे पडतो आहे.
जावळी तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार सुरेश शिंगटे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तर साळुंखे हे निवृत्त झाले आहेत. त्यामुळे महसूल नायब तहसीलदार शिरीष सपकाळ यांच्यावर सर्व विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. महसुलची कामे निकालात काढता यावीत, यासाठी महसूल कर्मचाऱ्यांची गरज भासते. तेही कर्मचारी अपुरे आहेत.
कनिष्ठ लिपिक बारा पैकी नऊ कार्यरत तर तीन प्रतिनियुक्तीवर आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालयात काम करतात, त्यामुळे प्रत्यक्षात सहाच लिपिक जावळीत आहेत तर त्यातील दोन लिपिकांची देखील बदली आदेश आले आहेत. त्यामुळे पुढे चारच लिपिकांवर कामे करून घेण्याची वेळ तहसीलदारांवर येणार आहे. तर अव्वल कारकूनची नऊ मंजूर पदांपैकी आठ कार्यरत आहेत तर एक रिक्त , एक प्रतिनियुक्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयात काम करीत आहे.महसूल विभागाच्या प्रतिनियुक्तीवरील अजब प्रकारामुळे तालुक्यातील जनतेची कामे वेळेत होण्यास विलंब होत आहे. नेमकं याला जबाबदार कोण असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.
अपुऱ्या कर्मच्यांऱ्यामुळे "झिरो पेंडन्सीला" खीळ
दोन नायब तहसीलदार पदे रिक्त तर कनिष्ठ लिपिकमधील तीन रिक्त, तीन प्रतिनियुक्तीवर जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालयात, तर अव्वल कारकून एक पद रिक्त तर एक प्रतिनियुक्तीवर, अशी परिस्थिती जावळीत असल्यामुळे दुर्गम, डोंगरी तालुक्यातील जनतेची कामे रखडली जात आहेत. त्यामुळे ह्यझिरो पेंडंसीह्णला खीळ बसत आहे. केवळ सातारा शहरापासून मेढा तहसील कार्यालय जवळ असल्यामुळे काम न करणारे कर्मचारी हे मुख्यालयात प्रतिनियुक्ती घेण्यासाठी वशिलेबाजी करतात. त्यामुळे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी तालुक्यातील जनतेची कामे जलद गतीने व्हावीत, यासाठी प्रतिनियुक्तीवर घेतलेले कर्मचारी तत्काळ जावळीत पाठवावेत, तसेच रिक्त पदेदेखील भरली जावीत, अशी मागणी संतप्त जावळीकरांमधून होत आहे.महसूल चा कर्मचारी प्रतिनियुक्ती प्रकार जावळीत खपवून घेतला जाणार नाही. दुर्गम, डोंगरी जावळीकरांची कामे तत्काळ व्हावीत, यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्वरित रिक्त पदे भरून प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी जावळीत पाठवावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल.- एकनाथ ओंबळे, नियोजन समिती सदस्य तथा
शिवसेना सातारा विधानसभा संपर्कप्रमुख