खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीकडे लक्ष वेधले आहे. जागोजागी कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन पक्षाची धोरणे स्पष्ट करण्यावर भर दिला गेला आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामुळे राजकीय फडात रंगत आली असून, ऐन पावसाळ्यातही राजकीय रणांगणात धुरळा उडतआहे.खंडाळा शहराची पहिली नगरपंचायत होत असून, १७ नगरसेवकांच्या यादीत आपल्या पक्षाला बहुमत मिळावे यासाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजपा आणि शिवसेना या प्रमुख पक्षांकडून सध्या चाचणी सुरू आहे. कॉँगे्रस व राष्ट्रवादी कॉँग्रेसची परंपरागत लढाई अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी दोन्ही कॉँगे्रसकडून निर्णायक लढ्याची तयारी चालवली आहे. खंडाळ्यातील सर्वच जागांवर सत्ता प्रस्थापित करण्याचा चंग बांधून कॉँग्रेसने खंडाळा शहराबाहेर एका मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. पंचायत समितीचे सदस्य अनिरुद्ध गाढवे, प्रकाश गाढवे, किरण खंडागळे, प्रल्हाद खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांंदाच खंडाळ्याच्या निवडणुकीसाठी मेळावा झाला. यामध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी मनमोकळेपणाने आपली मते मांडली. मेळाव्यानंतर कार्यकर्ते आपापल्या प्रभागामध्ये कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.खंडाळ्यातील गेल्या अनके वर्षांची कॉँग्रेसची सत्ता मोडीत काढून आपले प्राबल्य सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने कंबर कसली आहे. प्रत्येक प्रभागात बेरजेचे राजकारण आणण्यासाठी राष्ट्रवादीनेही अॅड. शामराव गाढवे, प्रा. भरत गाढवे, शैलेश गाढवे, शिवाजीराव खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यामुळे तरुण फळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी नियोजनाची जुगलबंदी सुरू असतानाच स्थानिक शिवसेना व भाजपाची रणनीती मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. प्रथमच खंडाळा शहरात भाजपा निवडणुकीला सामोरे जात असल्याने ठोस धोरण आखण्यावर त्यांचा भर आहे. शहराचा रोल मॉडेल आराखडा तयार करूनच लोकांसमोर पोहोचण्याची रणनीती भाजपाच्या माध्यमातून सुरू आहे. तर शिवसेनेने सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’ अशी भूमिका घेऊन ऐनवेळी पत्ते उघड करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)उमेदवारांची चाचपणी सुरूदोन्ही कॉँग्रेसने उमेदवारांची चाचपणीही सुरू केली आहे. विशेषत: ज्या प्रभागात महिला उमेदवार द्यायच्या आहेत, तेथे कार्यकर्त्यांची मनधरणी केली जातेय. तर सामंजस्याने इतर उमेदवार निश्चित करण्यासाठी इच्छुकांचा कानोसा घेतला जात आहे. व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ ही भावना कार्यकर्त्यांच्या गळी उतरविण्यासाठी दोन्ही कॉँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे यावेळी कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे शह-काटशहाचे राजकारणाचा दबदबा पाहायला मिळणार हे निश्चित आहे. तर शिवसेना-भाजपाची ऐनवेळी लढाई रंगत आणेल असे वाटते.निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना योग्य दिशा द्यावी या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला गेला. नगरपंचायतीसाठी पहिली लढत असली तरी कॉँगे्रसला खंडाळ्याच्या निवडणुकीचा चांगला अनुभव आहे. आमची काही धोरणे स्पष्ट आहेत.- प्रकाश गाढवे, कॉँग्रेस, खंडाळाराष्ट्रवादी कॉँग्रेसने योग्य नियोजनानुसार निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले आहे. बैठकीद्वारे कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल. शेवटी परिवर्तन हा काळाचा नियम आहे.- शैलेश गाढवे, राष्ट्रवादी, खंडाळा
राजकीय फडात मेळाव्याने रंगत
By admin | Published: September 16, 2016 9:54 PM