मलकापूर : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग व कऱ्हाड-ढेबेवाडी रस्ता हे स्वच्छ ठेवणे खऱ्याअर्थाने नगरपालिका प्रशासनापुढे आव्हानच आहे. ते आव्हान स्थानिक प्रशासनाने स्वीकारून महामार्ग देखभाल विगाभाच्या मदतीने रस्ते चकाचक ठेवले आहेत, तर लॉकडाऊनमुळे कमी झालेल्या वाहतुकीचा फायदा घेत उड्डाण पुलाला सतरा वर्षांत तिसऱ्यांदा रंगरंगोटी करून पुन्हा एकदा नवी झळाळी दिली आहे.
महामार्गावरील सुरक्षित वाहतूक व अपघात कमी करण्यासाठी महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. १९९४ साली हा नवीन महामार्ग वाहतुकीस खुला केला. रुंदीकरणावेळी सुशोभिकरणासह ठिकठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग व गरजेनुसार पादचारी पुलाची निर्मिती केली. त्यानुसार येथील कोल्हापूर नाक्यावर उड्डाण पुलाची निर्मिती केली. मलकापूर शहरातील दोन किलोमीटरच्या पट्ट्यात दोन उड्डाणपूल बनवले आहेत. महामार्गाकडेला दुतर्फा अनेक व्यवसाय थाटल्याने या परिसरात वर्दळ असते. म्हणून पादचाऱ्यांना महामार्ग ओलांडण्यासाठी कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल संपला, त्याच ठिकाणी पादचारी पुलाची निर्मिती केलेली आहे. तसेच कृष्णा रुग्णालयासमोरही भराव पुलाची निर्मिती केलेली आहे. या भराव पुलाला मलकापूर फाट्यासह तीन ठिकाणी कमी उंचीचे भुयारी मार्ग केले आहेत, तर शिवछावा चौक व कृष्णा रुग्णालयासमोर उड्डाणपूल तयार केले आहेत. सुरुवातीला रुंदीकरणानंतर दोन्ही उड्डाण पुलांची रंगरंगोटी करूनच पूल वाहतुकीस खुले केले. त्यानंतर केवळ साईड गार्ड व दुभाजकालाच पट्टे मारण्याचे काम देखभाल विभागाने वारंवार केले आहे. मात्र संपूर्ण उड्डाण पुलाला रंगरंगोटी २०१८ च्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेवेळी मलकापूर पालिकेच्या पुढाकाराने केली. त्यानंतर सध्या लॉकडाऊनमुळे वाहतुकीची वर्दळ कमी झाल्यामुळे व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी पुलांच्या रंगरंगोटीचे काम हाती घेतले आहे. रुंदीकरणानंतर सतरा वर्षांत तिसऱ्यांदा पुलांचे रंगकाम करून उड्डाण पुलाला नवी झळाळी देण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
(चौकट)
ब्रशऐवजी रोलरचा वापर
उड्डाण पुलाखालून उंचीवर काम करण्यासाठी आधुनिकतेचा वापर केला जात आहे, तर रंग देण्यासाठी पारंपरिक ब्रशऐवजी रोलरचा वापर केला जात आहे. त्यामुळे रंगरंगोटीचे काम उरकण्यास मदत होत आहे.
फोटो आहे...