औंध : खटाव तालुक्यात व विशेषतः औंध परिसरातील अनेक गावांनी पानी फाैंडेशनमध्ये मोठ्या हिरीरीने सहभागी होऊन आपली गावे पाण्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी एकजूट दाखविली. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा ‘स्पर्धेसाठी नव्हे, तर गावासाठी’ अशी एकजूट करून पाणी, वृक्षारोपण तसेच त्यावेळी केलेल्या कामांची देखभाल-दुरुस्ती होणे आवश्यक आहे. कारण काही बंधाऱ्यात, ओढ्यात झाडे-झुडपे व गाळ साठून राहिला आहे. त्यामुळे या कामांवर वरवर हात फिरला तरी त्याचा उपयोग जलसंधारणासाठी होऊ शकतो.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत खटाव तालुक्यातील गावेच्या गावे सहभागी झाली. त्यामध्ये उत्स्फूर्तपणे काम केले. यापैकी औंध परिसरातील भोसरे, जायगाव, खबालवाडी, गणेशवाडी, गोपूज या गावांनी कौतुकास्पद कामगिरी केली, तर उर्वरित सहभागी गावांना काम केलेला फायदा दिसून आला. पानी फाैंडेशनच्या कामांमुळे ज्या खटाव तालुक्यात डिसेंबर जानेवारीपासून टँकर लागत होता, त्यांना एप्रिल-मे उजाडला तरी टँकरची आवश्यकता भासली नव्हती.
आजअखेर त्या कामांचा फायदा मिळत आहे. मात्र केलेल्या कामांची देखभाल दुरुस्ती झाली, तर पुन्हा एकदा शेती पाण्यासाठी गावे स्वयंपूर्ण बनण्यास अडचण येणार नाही. अनेक गावांत बंधारे झाले आहेत, त्या बंधाऱ्याची आताची स्थिती काय आहे. ओढा खोलीकरण, रुंदीकरण, डीपसीसीटी, सलग समतल चरी, बांधबंदिस्ती आदी झालेल्या कामांचे सर्वेक्षण होऊन प्रत्येक गावांनी पाण्याचा आराखडा बनविण्याची पुन्हा गरज आहे. कारण रब्बी हंगामात वरुणराजाने दिलेली ओढ व विहिरी, कूपनलिका यांची खालावलेली पाणी पातळी याचा विचार करता, पुन्हा एकदा गावांनी एकजूट होऊन लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.
पानी फाैंडेशनच्या कामानंतर आता पुन्हा गावांनी पाणी आणि वृक्ष यावर काम करणे गरजेचे आहे. तीन वर्षांपर्यंत मागील कामाचा फायदा मिळतो. आता यापुढे अधिकचा फायदा हवा असल्यास पुन्हा झालेल्या कामांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी जलक्रांतीची चळवळ आपल्या हितासाठी गावोगावी सुरू व्हावी, यासाठी सेवाभावी संस्था, मोठमोठ्या कंपनी यांच्या सीएसआर फंडातून कामे होण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार आवश्यक आहे - अतुल पवार, स्वयंसेवक पानी फाैंडेशन