सातारा : येथील कोडोली परिसरातील जानाई, मळाईदेवीचे दर्शन घेऊन घरी परतत असताना दुचाकी कट्ट्याला धडकून झालेल्या अपघातात पती ठार, तर पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी महामार्गावर डी मार्ट शॉपच्या समोर झाला.
भाऊसो कृष्णा येळे (वय ३५) असे अपघातात ठार झालेल्या पतीचे, तर सविता भाऊसो येळे (३०, दोघेही रा. लिंब, ता. सातारा) असे जखमी पत्नीचे नाव आहे. सविता यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी सकाळी सातारा येथील जानाई-मळाईदेवीच्या दर्शनासाठी हे दाम्पत्य दुचाकीवरून गेले होते. डोंगरावर जाऊन देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या दुचाकीवरून लिंब येथील घरी परत जात होते.
मात्र, राष्ट्रीय महामार्गावर साताराजवळ असणाऱ्या डी मार्टनजीक भाऊसो येळे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी एका कट्टयाला धडकली. यात भाऊसो यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी सविता येळे या जखमी झाल्या. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, येळे यांच्या अपघाताचे वृत्त कळताच त्यांच्या इतर कुटुंबीयांनी तसेच नातेवाइकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. अपघाताची प्राथमिक नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. अपघातात गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र, भाऊसो येळे यांना अपघातात आपला जीव गमवावा लागल्याने लिंब गावात शोककळा पसरली आहे.