सातारा : पावसाळा सुरू झाल्यापासून निसर्गसंपन्न सातारा शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. शिवाय जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने येथे नोकरदार, विद्यार्थी तसेच परिसरातील शेतकऱ्यांची नेहमीच रेलचेल असते. मात्र, शहराच्या प्रवेशद्वारावरच भले मोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांमध्ये दुचाकी वाहने आदळून दुचाकीस्वार जायबंदी होत आहे.
सातारा शहराला लागून गेलेल्या पुणे-बंगळुरू महामार्गामुळे या शहराच्या विकासाची गाडी गतिमान झाली. महामार्गाच्या दुतर्फा मोठ-मोठ्या कंपन्या, उद्योग, हॉटेल सुरू झाले. शेकडो हातांना रोजगार मिळाला. मात्र, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या व शहरात येणाऱ्या पर्यटकांना आजतागायत भौतिक सुविधा मिळाल्या नाहीत. महामार्गावर कुठेही स्वच्छतागृह नाही की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. टोल भरून प्रवाशांना महामार्गावरील खड्ड्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
महामार्ग प्राधिकरणने शेंद्रे ते लिंब खिंड या मार्गावरील खड्ड्यांची महिनाभरापूर्वी मलमपट्टी केली. त्यामुळे वाहनधारकांना तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र, आता उड्डाणपुलाखाली देखील खड्ड्यांनी रांगोळी साकारली आहे. बॉम्बे रेस्टॉरंट येथे सामाजिक न्याय भवनकडे जाणाऱ्या चौकात प्रचंड खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचे आकारमान दिवसेंदिवस वाढत चालले असून, हे खड्डे बुजविणार तरी कोण? असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.