टाळगाव (ता. कऱ्हाड) येथे जिल्हा कबड्डी असोसिएशन व सनसनाटी स्पोर्ट क्लब यांच्या वतीने जिल्ह्यस्तरीय कुमार-कुमारी कबड्डी निवड चाचणी स्पर्धांना सोमवारी प्रारंभ झाला. स्पर्धेत सुमारे ३५ संघ सहभागी झाले आहेत.
टाळगाव येथील मैदानात प्रथमच या स्पर्धा होत आहेत. स्पर्धा उद्घाटन भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव संग्राम उथळे, महाराष्ट्र राज्य पंच महामंडळ सदस्य रमेश देशमुख, सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
दुपारी एक वाजता स्पर्धांना प्रारंभ झाला. स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत स्पर्धा सुरू होत्या. अविनाश ढमाळ, निवास पाटील, तानाजी देसाई, अजित देसाई, सिद्राम जाधव, शिवाजी जाधव, उमेश भोसले, शशिकांत यादव हे पंच म्हणून काम पाहत आहेत. रमेश थोरात यांचे सूत्रसंचालन सर्वांना खिळवून ठेवत आहे.
स्पर्धा मंगळवारी उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विनोद पाटील, उमेश जाधव, रवींद्र सपकाळ, अविनाश पाटील, सुरेश पाटील, सचिन देसाई, शांताराम सपकाळ, आदी संयोजक परिश्रम घेत आहेत.