शिबिराची सुरुवात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करून करण्यात आली. पैलवान धनाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ, कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश मानुगडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पैलवान महेश भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पैलवान धनाजी पाटील म्हणाले, ‘कुस्ती आणि कऱ्हाड तालुका यांचे घनिष्ठ नाते आहे. ऑलिम्पिकमधील कुस्ती प्रकारात पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव याच मातीतले अन् महाराष्ट्र केसरी ठरलेले संजय पाटील याच मातीतले; त्या भूमीमध्ये पहिले पंच प्रशिक्षण होत आहे याचा विशेष आनंद वाटतो.’
तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये कुस्तीतील चांगले पंच तयार करण्यात येणार आहेत. पंच म्हणून काम करत असताना नेमकी काय काळजी घ्यायची, गट कसे पाडायचे, गुणदान कसे करायचे या सर्व बाबी प्रशिक्षणार्थींना शिकवल्या जाणार आहेत. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी धनाजी जाधव, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राहुल जाधव, सातारा जिल्हा अध्यक्ष अमर साबळे, कऱ्हाड तालुकाध्यक्ष संग्राम माने आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.