लोकमत न्यूज नेटवर्क
शेंद्रे : मुंबईकर तरुणांची गावाविषयी असणारी ओढ कायम असते. ते शरीराने मुंबईत असले तरी मनाने ते गावाकडेच असतात. त्यांनी गावासाठी दाखवलेली बांधिलकी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
सातारा तालुक्यातील कौंदणी, नरेवाडी येथे मुंबईकर तरुण व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गावातील कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. विक्रम पवार, महाराष्ट्र बाजारपेठेचे अध्यक्ष कौतिक दांडगे, संजय शिर्के, संदेश शिरसाट, महेश पाटील, प्रभाकर दाते, दीपक बोदडे, जीवन घाडगे, विनोद कदम आदींची उपस्थिती होती.
दिलीप यादव यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. सरपंच सीमा विजय यादव, उपसरपंच संपत चव्हाण, सदस्य धनश्री माने, अनिल साळुंखे तसेच ग्रामस्थही उपस्थित होते. यावेळी मास्क, सॅनिटायझर, रेशनिंग किट तसेच कोविड सेंटरसाठी वस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमात कोरोना समिती, आशा सेविका, डॉक्टर, ग्रामसेवक तलाठी, पोलीसपाटील आदींचा गौरव करण्यात आला.