वाई : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी वाहतूक नियंत्रण व विनाकारण प्रवास करणाऱ्या नागरिकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अल्पोपहाराची व्यवस्था करून सर्वांगी प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली आहे,’ असे गौरवोद्गार पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी काढले.
वाईत सुमारे पंच्याहत्तर पोलीस कर्मचारी तळपत्या उन्हात, पावसात कर्तव्य बजावत असतात. हे सर्व नागरिक पाहत आहेत. सर्वांगी प्रतिष्ठानच्या संपर्क प्रमुख असणाऱ्या मीरा अडसूळ यांनी पती संजय अडसूळ यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांना तीन दिवसांचा अल्पोपहार देण्याचे स्वखर्चाचे नियोजन केले. तसेच इतर दिवसांचा अल्पोपहार सर्वांगी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी देणगीतून उचलला व पोलीस कर्मचाऱ्यांना चार दिवसांचा अल्पोपहार वितरित केला.
उपक्रमाचे नियोजन संस्थापक विश्वास सोनावणे व अध्यक्ष राजेश भोज यांनी केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कदम, संजय मोतेकर, रवींद्र तेलतुंबडे, माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष रोहिणी पवार, किशोर फुले, प्रकाश मांढरे, अशोक येवले, यशवंत लेले,संजय सकटे,
सोमनाथ आवळे, अश्विनी आवळे, उस्मानभाई बागवान, राजेंद्र गोंजारी, मीरा अडसूळ आदींनी परिश्रम घेतले.