कऱ्हाड/इस्लामपूर : ‘गेल्या सहा वर्षांत विद्यमान संचालक मंडळाने शेतकरी सभासदांच्या विश्वासास पात्र राहून काम केले आहे. येत्या काळातही सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार पॅनेल कटिबद्ध राहणार आहे,’ असे प्रतिपादन कृष्णा बॅकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी केले.
दुधारी (ता. वाळवा) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटाच्या प्रचारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उमेदवार जितेंद्र पाटील, जे. डी. मोरे, अविनाश खरात, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, राजारामबापू सह बँकेचे संचालक आनंदराव लकेसर, जीवन कदम, माजी सरपंच प्रदीप पोळ, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण यादव, नंदकुमार पाटील, भानुदास यादव, ग्रामपंचायत सदस्य सुशील सावंत, शामराव पाटील, अधिक जाधव, मोहन लकेसर, मानसिंग पाटील उपस्थित होते.
भोसले म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी शेतीवर प्रक्रिया करणारा कारखाना या भागात उभारला गेला. शेतकरी सभासद हिताचे उपक्रम राबवत कृष्णा हा ब्रँड तयार झाला आहे. दिवंगत जयवंतराव भोसले यांनी कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून कृष्णाकाठाला समृद्धी प्राप्त करून दिली. आज डॉ. सुरेश भोसले यांनी कृष्णा कारखान्याला राज्यात अग्रेसर बनवले आहे. शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत सरासरी तीन हजार इतका दर दिला आहे. मोफत साखरेचे अभिवचन पूर्ण केले आहे. कारखान्यास आर्थिक शिस्त घालून उत्कृष्ट कारभार केला आहे. येत्या काळात सत्तेत आल्यावर कारखान्याची गाळपक्षमता बारा हजार मेट्रिक टन प्रतिदिन करण्याचा मानस आहे.
हार्वेस्टिंग मशीन जास्तीत जास्त उपलब्ध करून तोडणी यंत्रणा सुलभ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गाळपक्षमता वाढवण्याबरोबरच कारखान्याचा विस्तार, सहवीजनिर्मिती क्षमता, डिस्टिलरीची क्षमता वाढवणार आहोत. तोडीच्या बाबतीतल्या समस्याही सोडवून तोडणी प्रक्रिया सुलभ बनविणार आहोत. या निवडणुकीतही सहकार पॅनेलच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहावे, असे आवाहनही डाॅ. भोसले यांनी केले.
फोटो
दुधारी ता. वाळवा येथे प्रचार बैठकीत डाॅ. अतुल भोसले यांनी कारखान्याच्या सद्यस्थितीची माहिती दिली.