सातारा : गुरूकमोडिटीज्चा ‘गुरू’ कोण आणि या गुरूची यमाई परिसरातील ‘कमोडिटी’ कोण हे आम्हाला माहिती आहे. गुरूआणि त्याच्या कमोडिटीनेच कुटील कारस्थान रचून जरंडेश्वरचे गुरू कमोडिटीच्या नावाने खासगीकरण केले. याबाबत आता अजित पवारांनीच जनता व शेतकऱ्यांना समजेल अशा पध्दतीने खुलासा करावा, अन्यथा कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन ‘गुरू’ची ‘कमोडिटी’ जनतेसमोर जाहीरपणे आणावी लागेल, असा थेट वार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात उदयनराजे यांनी म्हटले आहे की, जरंडेश्वरचे गुरूकमोडिटीजच्या माध्यमातून खासगीकरण करताना, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांद्वारे खासगीकरणाला विरोध करणाऱ्या आम्हास गुरू कमोडिटीज्चा गुरू कोण हे माहिती आहे का, असा प्रश्न केला होता. ही गोष्ट आम्हाला त्यावेळीही माहिती होती आणि आजही आहे. गुरूकमोडिटीज् या कंपनीची वार्षिक उलाढाल दहा लाखांची. त्यात त्यांचा नफा फक्त चार लाखांचा होता. त्यांना पहिल्या व दुसऱ्या खुल्या फेरीत जरंडेश्वर मिळाला नाही. त्यानंतर तिसऱ्या बंद लिफाफा फेरीत गुरूकमोडिटीज्ला ६५ कोटींचा कारखाना लिलावात कसा दिला गेला. असा सवालही उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.या गुरू कमोडिटीज्चा गुरूकोण आणि त्याची यमाई परिसरातील ‘कमोडिटी’ कोण हे ते स्वत:हून जाहीर करण्याचे धाडस दाखविणार नाहीत, तथापि त्यांनी तसे न केल्यास त्यांच्या गोपनीय असलेली तसेच रचलेल्या कारखाना कटकारस्थानांची, सूडबुध्दीची आणि दडपशाही वापरून केलेल्या सर्व कारनाम्यांची माहिती संसदीय अधिवेशन संपताच जरंडेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्या सभासद शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन घोषित करण्यात येईल, असा इशाराही खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात दिला आहे. (प्रतिनिधी)‘जरंडेश्वर’साठी जनआंदोलन उभारणार कोरेगाव-खटाव कार्यक्षेत्र असलेल्या तत्कालीन जरंडेश्वर सहकारी कारखान्याच्या परिसरातील आई यमाईदेवीला साक्षी ठेवून, त्यांनी गुरु कमोडिटीज्मधील ‘गुरू’ कोण व त्याची ‘कमोडिटी’ कोण हे विस्तृतपणे सांगितले नाही तर, लवकरच याचा पर्दाफाश करुन, सोक्षमोक्ष लावणार आहोत. तथापि, पूर्ण ताकदीने जनरेटा उभारुन, पुन्हा हा कारखाना सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी संघर्षात्मक जनआंदोलन सनदशीर मार्गाने उभारणार आहोत, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
‘गुरू’ची ‘कमोडिटी’ जगासमोर आणणार !
By admin | Published: March 10, 2015 10:43 PM