कऱ्हाड : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी संचारबंदी करण्यात आली असली तरी पहिल्याच दिवशी या बंदीला झुगारून अनेकजण खुलेआम फिरताना दिसून आले. ठिकठिकाणी तैनात पोलिसांनी काहीजणांना अडवले. चौकशीही केली; पण अत्यावश्यकच्या नावाखाली दिली जाणारी वेगवेगळी कारणे आणि ना-ना तऱ्हा ऐकून पोलीसही हतबल झाल्याचे दिसून येत होते.
शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या कोल्हापूर नाक्यावर गुरुवारी सकाळपासून पोलीस कर्मचारी तैनात होते. शहरात येणारी वाहने अडवून त्यांची चौकशी केली जात होती. त्यावेळी अनेकजण किराणा, भाजीपाला, दवाखान्याचे कारण सांगून तेथून काढता पाय घेत होते. पोपटभाई पेट्रोल पंप चौकातून शाहू चौकाकडे जाणारा मार्ग पोलिसांनी रोखला होता. त्यामुळे काहीजण पंकज हॉटेलच्या पाठीमागील रस्त्याने तर काहीजण भेदा चौकमार्गे मार्गस्थ होत होते. विजय दिवस चौकातही पोलीस बंदोबस्त होता. मात्र, त्याठिकाणीही पोलिसांना न जुमानता बिनधास्त ये-जा सुरूच होती.
दत्त चौक ते मुख्य बाजारपेठेतील आझाद चौकापर्यंतचा रस्ता खुला आहे. त्यामुळे चारचाकीसह दुचाकींची या रस्त्यावर वर्दळ सुरूच होती. आझाद चौकातून चावडी चौकाकडे जाणारा रस्ता बॅरिगेट्स बंद करण्यात आल्यामुळे पर्यायी रस्त्याने ये-जा सुरू होती. बसस्थानकापासून कृष्णा नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरही कोणताच अडथळा नसल्यामुळे या मार्गावर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. कृष्णा नाक्यावरून मंगळवार पेठेत जाणारा रस्ता पोलिसांनी पूर्णत: रोखला होता. मात्र, तरीही इतर मार्गाने ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त होती. एकूणच अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास बंदी असली तरी ही बंदी झुगारून दिवसभर शहरात खुलेआम वावर असल्याचे दिसून आले.
- चौकट (फोटो : १५केआरडी०४)
दूध पिशवीसाठी दुचाकीवर दोघे
कोल्हापूर नाक्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांना पोलिसांनी अडवले. घराबाहेर पडण्याचे कारण त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी दूध पिशवीचे कारण त्यांनी सांगीतले. दूध पिशवीसाठी दुचाकीवरून आलेल्या त्या दोघांना पाहून पोलिसांनीही कपाळावर हात मारला.
- चौकट
जुन्या पुलावरूनही बिनधास्त वाहतूक
कोयना नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून होणारी दुचाकीची वर्दळ रोखण्यासाठी पोलिसांनी यापूर्वी बॅरिगेट्स लावले होते. मात्र, गुरुवारी पुलावर कोठेही अडथळा नव्हता. त्यामुळे कोल्हापूर नाक्याकडे न जाता अनेकजण या पुलावरून ये-जा करीत होते.
- चौकट (फोटो : १५केआरडी०२)
विनामास्क फिरणाऱ्यांना दंड
अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्यातच काहीजण विनामास्क फिरतानाही दिसून येत होते. अखेर अशा बेजबाबदारपणे वागणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. बसस्थानकासमोरही गुरुवारी दुपारी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी विनामास्क वावरणाऱ्यांना दंड केला.
फोटो : १५केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडात प्रवेश करणारी वाहने अडवून पोलिसांकडून त्यांच्याकडे चौकशी केली जात होती.
फोटो : १५केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाडातील किराणा दुकानात गुरुवारीही खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती.