वाई : वाई औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या मेलआयडीचा गैरवापर करून अकाऊंट हॅक करून सायबर चोरट्याने कंपनीचे तब्बल १ कोटी ५३ लाख ५२ हजार ७०० रुपये लंडनमधील बॅंकेत ट्रान्सफर करून घेतले. हा प्रकार समोर आल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकाने वाई पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.मालाज फूड प्रॉडक्ट प्रा. लि. या कंपनीने फ्रान्स येथील कंपनीला मशीन तयार करून देण्याची ऑर्डर दिली होती. त्याप्रमाणे वेळोवेळी त्या कंपनीला त्यांनी मागणी केल्याप्रमाणे अनामत रक्कम पाठवली. यापूर्वी या कंपनीला काही अनामत रक्कम देण्यात आली होती. जानेवारी महिन्यात या कंपनीला १ लाख ७० हजार युरो म्हणजे भारतीय बाजार मूल्य किंमत १ कोटी ५३ लाख ५२ हजार ७०० रुपये त्यांनी सांगितलेल्या खात्यावर पाठविले. त्याप्रमाणे मेलवर पत्र व्यवहार झाला होता. यानंतर जानेवारी महिन्याच्या अखेरीस फ्रान्स येथील कंपनीशी प्रत्यक्ष बोलणे झाल्यावर त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्याचे त्यांनी कळविले. त्यावेळी त्यांचे खाते अज्ञात हॅकरने हॅक केले असून, ही रक्कम परस्पर लंडनमधील एका बॅंकेच्या खात्यावर ट्रान्सफर झाल्याचे त्या कंपनीने कळविले.यानंतर मालाज कंपनीने त्यांच्या बँकेशी व सायबर गुन्हे शाखेची संपर्क साधून याबाबत माहिती दिली. यानंतर फ्रान्स स्थित बँकेने ही रक्कम असलेल्या खात्यावरील व्यवहार थांबविले आहेत. यादरम्यान सायबर हॅकरने किती रक्कम लांबविली, हे अद्याप समोर आले नाही. मालाज कंपनीचे व्यवस्थापक श्रीपाद सहस्त्रबुद्धे यांनी अज्ञात हॅकरविरोधात वाई पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वाई पोलिस आणि सायबर गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.आंतरराष्ट्रीय सायबर हॅकरचे रॅकेट..सातारा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम हॅक करण्याची सायबर चोरट्यांची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय सायबर हॅकरचे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता सायबर पोलिसांनी वर्तवली आहे.
वाईतील कंपनीचे अकाऊंट हॅक; लंडनमधील बँकेत दीड कोटी ट्रान्सफर, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 22:41 IST