कऱ्हाड : टेंभू धरणग्रस्तांना मोबदला मिळावा, यासाठी शेतकरी नेते सचिन नलवडे यांनी लढा उभा केला आहे. शुक्रवारी सैदापूर येथील शेतकऱ्यांना बरोबर घेत सर्व धरणबाधितांच्या जमिनीची संयुक्त मोजणी करावी, बाधित जमिनीचा बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्यात यावा, असे निवेदन टेंभू उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता राजन रेडियार, कार्यकारी अभियंता राजेश हाडदरे, सहाय्यक अभियंता जयवंत चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी सैदापूर येथील दत्तात्रय जाधव, शरद जाधव, तानाजी जाधव, बबन सय्यद, दिलावर सय्यद, फकरुद्दीन सय्यद, पंडित वाघमारे, सावंता कांबळे, अरुण कांबळे उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, सैदापूर येथील गोवारे हद्दीपासून ते रेणुकामाता मंदिरापर्यंतची जमीन ही गेल्या दहा ते बारा वर्षांपासून टेंभू धरणाच्या पाण्याखाली गेलेली आहे. बाधितांनी गेल्या दहा वर्षांपासून जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी धरण व्यवस्थापनाला निवेदने दिली आहेत; परंतु त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
सैदापूर येथील शेतकऱ्यांनी आमच्या जमिनीची संयुक्त मोजणी व भूसंपादन प्रस्तावाची प्रक्रिया येत्या दहा दिवसांत सुरू न झाल्यास आम्ही सचिन नलवडे यांनी जाहीर केलेल्या जलसमाधी आंदोलनात सहभाग घेणार असल्याचा इशाराही या निवेदनातून दिला आहे.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान कार्यकारी अभियंता राजन रेडियार यांनी सैदापूर येथील बाधित होणाऱ्या व धरणाच्या पाण्याखाली जाणाऱ्या सर्व क्षेत्राची आम्ही लवकरच संयुक्त मोजणी करण्याबद्दलचे पत्र भूमी अभिलेख कार्यालयाला देत असल्याचे सांगितले.