कोयनानगर : उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात खोटे आणि निराधार आरोप करणाऱ्या उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात पाटण न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी पाटण न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. उबाठा गटाच्या सुषमा अंधारे यांनी १८ ऑक्टोबर २०२३ रोजी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाच्या अनुषंगाने उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निराधार आरोप केले होते. त्यानंतर तातडीने या प्रकरणाशी आपला दुरान्वयानेही संबंध नसल्याचे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले होते.
सुषमा अंधारे यांनी केलेल्या खोट्या व खोडसाळ आरोपांबाबत त्यांनी माफीनामा व खुलासा द्यावा. याकरिता मंत्री देसाई यांनी अंधारे यांना ई-मेल व पत्त्यावर कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र, या नोटिसीला सुषमा अंधारे यांनी कोणतेही उत्तर अद्याप दिलेले नाही. अंधारे यांनी जाणीवपूर्वक केलेली वक्तव्ये ही निव्वळ मंत्री देसाई यांची प्रतिष्ठा व प्रतिमा मलीन करण्यासाठी केली होती. त्यामुळे शुक्रवारी न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीद्वारे सुषमा अंधारे यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.