सातारा : तीन लाख रुपये दिले नाही तर कुरिअर आॅफिस उघडू देणार नाही, अशी धमकी देऊन भाजपच्या नगरसेविका सिद्धी पवार यांना खंडणी मागितल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला.प्रदीप उर्फ रवींद्र सूर्यकांत साळुंखे (रा. कोडोली, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नगरसेविका सिद्धी पवार यांनी रवींद्र साळुंखे यांचा कुरिअर कंपनीसाठी गाळा भाड्याने घेतला होता.
हा दुकान गाळा सोडण्यावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादावादी सुरू आहे. रवींद्र साळुंखेने दोन दिवसांपूर्वी दुकानात जाऊन तीन लाख रुपये दे, नाहीतर आॅफिस उघडू देणार नाही,अशी धमकी दिली. तसेच आॅफिसला लॉक लावले. हे लॉक काढण्यासाठी पवार यांनी साळुंखेला सांगितले असता उलट अर्वाच्च भाषेत साळुंखेने शिवीगाळ केली.