खंडाळा : ‘अधिकारी व पदाधिकारी यांनी समन्वयाने काम केल्यास गावोगावी शासकीय योजना प्रभावीपणे राबू शकतात. खंडाळा तालुक्यातील राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणी जिल्हा परिषदेच्या मार्फत सोडविल्या जातील,’ असे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी दिले.खंडाळा पंचायत समितीच्या किसन वीर सभागृहात स्वच्छ भारत अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष रवी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, शिक्षण सभापती अमित कदम, उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, स्वाती बरदाडे, तहसीलदार शिवाजी तळपे, सभापती रमेश धायगुडे, सदस्य नितीन भरगुडे-पाटील, दीपाली साळुंखे, अनिरुद्ध गाढवे, अनिता शेळके, अजय धायगुडे, मनोज पवार, गटविकास अधिकारी विलास साबळे आदी उपस्थित होते.सोनवलकर म्हणाले ‘स्वच्छ भारत अभियानात’ प्रत्येक गावी एक कुटुंब, एक शौचालय योजना प्रभावीपणे राबवा, निर्मलग्रामसाठी तालुक्याने चांगले काम केले होते. त्याप्रमाणे हे अभियान यशस्वी करावे. ‘मनरेगा’ची कामे करताना सरपंचांना विश्वासात घेऊन करण्यात यावीत. ग्रामसेवकांनी याबाबत काळजी घ्यावी. शासकीय योजनांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे.मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत म्हणाले, ‘स्वच्छ भारत अभियानात सर्वच अधिकाऱ्यांनी प्रमाणिकपणे काम करावे. कामात चुकारपणा केला तर संबंधितावर कारवाई केली जाईल. लोकांच्या भल्यासाठी शासनाने राबविलेल्या योजना लोकांपर्यंत पोहचविणे हे आपले काम आहे. योजना राबविताना प्रत्येकाने मानसिकता बदलून विधायक दृष्टीने विचार करावा.’रवी साळुंखे, नितीन भरगुडे-पाटील, स्वाती बरदाडे यांनी मार्गदर्शन केले. विलास साबळे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)अडचणी मांडल्या...तालुक्यात मनरेगाची कामे करताना येणाऱ्या अडचणी सरपंचांनी मांडल्या, गतवर्षी केलेल्या कामांचे पैसे अद्याप दिले नसल्याचे मनोज पवार यांनी सांगितले. ग्रामसेवक अशोक पवार व सारिका हाके यांचा चांगल्या कामाबाबत सत्कार करण्यात आला.
रोजगार हमीची कामे पूर्ण करा
By admin | Published: December 18, 2014 9:38 PM