रामापूर : पाटण येथील महसूल विभागात तलाठी, चार मंडलाधिकारी, दोन नायब तहसीलदार पदे रिक्त व सहा महिन्याच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी तहसीलदार नेमणूक असतानाही पाटणच्या महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी माहे एप्रिलमध्ये दहा हजार फेरफार नोंदी मार्गी लावल्या आहेत. सातारा जिल्ह्यात एका महिन्यात फेरफार नोंदीचा हा विक्रम आहे.
खरेदी दस्त, गहाण खत, हक्कसोडपत्र, वारस, राजपत्र व इकरार या सातबारा उताऱ्याशी संबंधित फेरफार नोंदी तलाठी दप्तरी नोंदविण्यासाठी सामान्य खातेदारांना तलाठी अथवा मंडलाधिकाऱ्यांकडे जायचे म्हटले तर त्याला आर्थिक झळ बसणारच असा महसूल विभागाचा इतिहास. या इतिहासाला छेद देत एका महिन्यात १० हजार ३९५ फेरफार नोंदी निर्गत करण्याचा आणि १९ एप्रिल रोजी ६७५ फेरफार नोंदी एका दिवशी निर्गतीचाही विक्रम घडविला आहे. परिविक्षाधीन तहसीलदार योगेश्वर टोम्पे व त्यांच्या टीमने हा विक्रम केला आहे.
प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश्वर टोम्पे योग्य नियोजन करून ही किमया साध्य केली आहे. यासाठी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाचे निरीक्षक राजेश जाधव, नायब तहसीलदार बजरंग चौगुले, लॉकडाऊन काळातही १२-१२ तास काम केलेले मंडलाधिकारी व तलाठी यांचे मोलाचे सहकार्य त्यांना मिळाले. पब्लिक डेटा एंट्रीचा सर्वात जास्त पाटण तालुक्यात उपयोग झाल्याने विकास सेवा सोसायटींचे विक्रमी इकरार निर्गतीचे काम पूर्ण झाले आहे. सोसायट्यांच्या सचिवांना अधिक फायदा झाला आहे.
योगेश्वर टोम्पे यांनी सहा महिन्यांच्या कालावधीचा विचार न करता संजय गांधी निराधार योजनांचा निपटारा, घरपोहोच शिधापत्रिका मोहीम व अवैध खाणीवरील कारवाई यानंतर सर्वसामान्य जनतेच्या जिवाळ्याच्या फेरफार नोंदीचा विषय हाती घेतल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.