सातारा : जीएसटीच्या जाचक अटी रद्द करून सुटसुटीत करप्रणाली आणावी, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्ह्यासह सातारा शहरातील व्यापाऱ्यांकडून बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी संघटनांचा या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
याबाबत मर्चंट चेंबर्स ऑफ कॉमर्स सातारा शाखेच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वस्तू आणि सेवाकर कायद्यात १ जानेवारी २०२१ पासून आयटीसी (इनपूट टॅक्स क्रेडिट) घेण्यासंदर्भात बदल करण्यात आले आहेत. याचे पालन करणे व्यापारी वर्गास जाचक ठरणार आहे. या नव्या तरतुदींमुळे व्यापारी वर्गाची करदेयता वाढणार आहे. ओघानेच त्यांची आर्थिक ओढाताण वाढणार आहे. नव्या तरतुदी अंमलात आणताना व्यावहारिक पातळीवर या तरतुदींचे पालन करणे शक्य आहे का, याचा कोणताच विचार करण्यात आला नाही. अशा तरतुदींचे पालन न केल्यास जीसएटी नोंदणी दाखल रद्द होण्याची कारवाई होऊ शकते, अशी तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे.
या सर्व जाचक अटी रद्द करून करप्रणालीत सुटसुटीतपणा आणावा, या मागणीसाठी कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिटा ट्रेडर्स (कॅट) देशव्यापी व्यापार बंद ठेवण्याची हाक दिली होती. त्यानुसार सातारा शहरासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदवून शासनाच्या नव्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. बंदमध्ये किराणा, कापड, सोने, हार्डवेअर, रिटेलर, होलसेल, भांडीवाले, सातारा काॅम्प्युटर असोसिएशन, सातारा सॅनिटरी असोसिएशन, ट्रान्सपोर्ट असोसिशएशन आदींनी सहभाग घेतल्याची माहिती सातारा शहर मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजू गोडसे यांनी दिली.
(चौकट)
बाजारपेठेत शुकशुकाट
जीएसटीतील अन्यायकारक व किचकट तरतुदींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे शुक्रवारी साताऱ्यातील बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. राजवाडा, खणआळी, राजपथ, कर्मवीर पथ, राधिका रोड, पोवई नाका, तहसील कार्यालय ही गर्दीने गजबजणारी ठिकाणे दिवसभर ओस पडली होती.
फोटो : २६ जावेद ०२
कॅटने पुकारलेल्या देशव्यापी बंदला सातारा शहरातील व्यापारी संघटनांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापारी पेठेत बंदमुळे शुकशुकाट पसरला होता. (छाया : जावेद खान)