मायणी : सध्या स्पर्धेचे युग सुरु आहे आणि या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी संगणक ज्ञान अतिशय महत्त्वाची बाब बनली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून मायणी, ता. खटाव येथील जिल्हा परिषद शाळेने इयत्ता पहिली ते चौथीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुले व मुली यांच्यासाठी संगणक प्रयोगशाळा सुरू केली असून, शाळेच्या वेळापत्रकामध्ये संगणकाचे तास घेतले जात असून, विद्यार्थी रोज संगणकाचे धडे गिरवू लागले आहेत. १८६३ मध्ये सुरू झालेल्या मायणी जिल्हा परिषद शाळेत आज सुमारे ४५० विद्यार्थी (मुले व मुली मिळून) शिक्षण घेत आहेत. या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करताच शाळेच्या चारही बाजूला असणाऱ्या भिंतीवर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान, राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे, सुविचार आदी माहिती झळकत असलेली दिसते. या शाळेचे केवळ बाह्यांगच झळकत नाही तर प्रतिवर्षी येथील विद्यार्थी शिष्यवृत्ती, मंथन व अन्य बाह्य परीक्षेमध्ये गुणवान ठरले आहेत आणि ही परंपरा कायम चालू आहे. येथील शिक्षकवृंदही त्याच तळमळीने कष्ट करताना दिसत आहेत तर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत. आज या शाळेमध्ये मुख्याध्यापक अरुण कुमार खाडे व मुख्याध्यापिका नंदनी देशमुखे या कार्यरत आहेत.भक्कम इमारत, खेळाचे मैदान, स्वच्छ पाणी,निर्मल स्वच्छतागृह, खेळाचे भरपूर साहित्य, कलादालन, संगीत, साहित्य आणि प्रशिक्षित शिक्षक ही या शाळेची जमेची बाजू आहे. अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये असणारी ही शाळा यशाची परंपरा जपत आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान मिळविण्याएवजी संगणक ज्ञान अतिशय महत्त्वाची बाब बनली आहे. हा हेतू समोर ठेवून या शाळेने इयत्ता पहिली ते चौथीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुले व मुली यांच्यासाठी संगणक प्रयोगशाळा सुरू केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी संगणक प्रयोगशाळा असून, केवळ आठवड्यातून एक तास मुलांना संगणक हाताळायला मिळतो रोज संगणकाचे तास घेतले जाणार आहेत. (वार्ताहर)विद्यार्थी दररोज संगणकाचे धडे गिरविणार आहेत. आजच्या युगात संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे. याला कारण संगणकाचा वाढता विस्तार. आज असे कुठलेच ठिकाण शिल्लक राहिले नाही की जिथे संगणकाचा वापर होत नाही. त्यामुळे तंत्रज्ञान काळाची गरज असल्याने आम्ही मुलांसाठी संगणक प्रयोगशाळा सुरू केली.- अरुणकुमार खाडे, मुख्याध्यापक जि. प.शाळा मायणी मुलेसध्याचे युग संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. संगणक नावाच्या या यंत्राने आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केला असून, आमच्या शाळेतील मुलीही कोठे कमी पडू नयेत यासाठी संगणक प्रयोगशाळा सुरू केली आहे.- नंदनी देशमुखे, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा (मुली), मायणी संगणक ज्ञान काळाची गरज बनली असून, लहान वयातच मुलांना संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना परिपूर्ण संगणक ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार.- अर्चना जाधव, संगणक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा (मुली), मायणीआधुनिक काळाची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी पुरविण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व शिक्षक प्रयत्न करीत असतो. त्यासाठी लोकांच्या सहकार्याचीही गरज आवश्यक आहे.- रमजान इनामदार, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा (मुली), मायणी
मायणी जिल्हा परिषद शाळेत संगणकाचे धडे
By admin | Published: October 18, 2016 10:47 PM