फलटण : फलटण तहसीलदार कार्यालयातील महसूल शाखेतून दोन दिवसांपूर्वी संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, कीबोर्ड, माऊस, केबलसह राउटर असा सुमारे २ लाख ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यातील १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल बंद असलेल्या जिनिंगच्या इंजिनच्या गोडाऊनमध्ये सोमवारी सापडला आहे.
याबाबत माहिती अशी की, फलटण तहसील कार्यालयातील बाहेर ठेवलेल्या भांड्यातील चावीने कार्यालय उघडून शुक्रवार, दि. २९ च्या मध्यरात्री चोरट्यांनी आत प्रवेश करून आतील सर्व संगणक चोरून नेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलीस रात्रंदिवस तपास करीत असताना सोमवारी दुपारी तीन वाजता एक मुलगा बऱ्याच वर्षांपासून मुधोजी कॉलेजजवळील बंद पडलेल्या सहकारी जिनिंगमध्ये नैसर्गिक विधीसाठी गेला होता. त्यावेळी त्याला चार पोती दिसून आल्या. ही घटना त्याने पालकाला सांगितल्यावर त्यांनी फलटण शहर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता चार पोत्यांमध्ये चोरीला गेलेले संगणक साहित्य ठेवलेले आढळून आले. चोरीला गेलेल्यापैकी १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल सापडला. सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. गायकवाड तपास करीत आहेत