चाफळ : ग्रामीण भागातील मुला-मुलींना संगणकीय ज्ञान मिळावे, या हेतूने स्टेट बँकेच्या क्षेत्रीय उद्योग कार्यालयाकडून चाफळ येथील जिल्हा परिषद शाळेला पाच संगणक संच भेट देण्यात आले. यावेळी सरपंच सूर्यकांत पाटील, केंद्रप्रमुख अर्जुन पाटील, सुनील कोठारे, अनिल कोरे, श्याम जोशी, सुषमा जोशी, उत्तम साळुंखे, संदेश कुलकर्णी, सागर लोखंडे, तानाजी गुरव, वर्षाताई आगादिघे यांची उपस्थिती होती.
रक्तदान शिबिर
कऱ्हाड : सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे. कोरोनाग्रस्तांना रक्ताची आवश्यकता भासत असून ही गरज ओळखून काही तरुणांनी एकत्र येत रक्तदानाचा निर्धार केला आहे. कऱ्हाडातील शाहू चौकात असणाऱ्या आशा हाईट्स इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आज, बुधवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत रक्तदान होणार आहे.
घरकुलांची कामे ठप्प
कऱ्हाड : शासनाकडून मंजूर झालेल्या घरकुलांची कामे सध्या लॉकडाऊनमुळे ठप्प झाली आहेत. बांधकामासाठी लागणारे सिमेंट, वाळू, दारे, खिडक्या यांची दुकाने बंद आहेत. बांधकाम सुरू ठेवण्याची मुभा असली तरी दुकाने बंद असल्यामुळे घरकुलांची कामे बंद पडली आहेत.
वीज कोसळली
तळमावले : खळे (ता. पाटण) येथे रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी एका लिंबाच्या झाडावर अचानक वीज कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. बबन सुतार यांच्या पांढरीची पट्टी या शेतातील लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.